बेळगाव शहरातील गोगटे सर्कल येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कॉंक्रिटच्या रस्त्याला मधोमध धोकादायक भेग पडलेली असून अपघाताला निमंत्रण देणारी ही भेग तात्काळ बुजवण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील गोगटे सर्कलचे सौंदर्यीकरण करून या ठिकाणचे रस्ते नव्याने बांधण्यात आले आहेत. कॉंक्रिटीकरणाव्दारे बांधण्यात आलेल्या या रस्त्यांपैकी बेळगाव शहराकडे येणाऱ्या देसाई कंपाऊंड समोरील रस्त्याला मधोमध मोठी भेग पडली आहे.
रस्ता बांधकामावेळी काँक्रीटचे ब्लॉक व्यवस्थित घातले नसल्यामुळे ही भेग अलीकडे निर्माण झाली आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या फटीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष करून दुचाकीस्वारांसाठी ही भेग एखादे वेळेस जीवघेणी ठरण्याची शक्यता आहे.
रस्त्यावरील भेगेमध्ये दुचाकींची चाक अडकून कांही किरकोळ अपघातही यापूर्वी झाले आहेत. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर पडलेली सदर भेग तात्काळ बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.