बेळगाव – कर्नाटक राज्यात कोरोना आणि ओमिक्रोनचे संकट वाढले आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल मंगळवारी नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. आगामी दोन आठवडे रात्रीच्या कर्फ्यु बरोबरच शनिवार आणि रविवारी विकेंड कर्फ्यू लागू केला आहे.
त्याचबरोबर पुढील दोन आठवडे सामाजिक, राजकीय मेळावे, समारंभावर निर्बंध लादले आहेत. मोर्चे, यात्रा आंदोलनांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंदिर आणि प्रार्थना स्थळांमधील गर्दीला आळा घालण्यासाठी नवी नियमावली जारी केली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांमुळे यावर्षीची 17 डिसेंबर रोजी होणारी, सौंदत्ती श्री रेणुका देवीची चुडी पौर्णिमा यात्रा रद्द होणार आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी चालविली आहे.त्यामुळेच आगामी काळात बेळगाव जिल्ह्यात होणाऱ्या यात्रा बरोबरच मुख्य देवस्थानांचे दरवाजे बंद केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळात बंद ठेवण्यात आलेले सौंदत्ती रेणुका मन्दिराबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.कर्नाटक,महाराष्ट्र गोवा राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवता असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी दर्शनाला होणारी मोठी गर्दी पाहता डिसेंबर महिन्यातील पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता जानेवारी महिन्यात 17 तारखेला होणारी श्री रेणुका देवीची चुडी पौर्णिमा यात्रा राज्य शासनाच्या नव्या नियमानुसार रद्द होणार आहे.
सौंदत्ती रेणुका देवी देवस्थान बरोबरच जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रमुख देवस्थाने भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी केल्याचे कळते. कोरोना आणि ओमिक्रोनचा संसर्ग वाढू नये याची दक्षता घेत,जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील महत्वाची देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय घेणार आहे.