पावसाळ्यात पावसाचे पाणी तुंबून ते घराघरात शिरण्याची समस्या दूर व्हावी, पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा यासाठी रेल्वेमार्गाखाली पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ आज शुक्रवारी तानाजी गल्ली येथे करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह संबंधित भागातील नगरसेविक उपस्थित होते. आमदार बेनके यांच्यासह हस्ते श्रीफळ वाढवून तसेच मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून रेल्वे रूळ खालून पाईपलाईन करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तानाजी गल्ली, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली आदी परिसरातील नागरिक आणि महापालिका व रेल्वे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी हाती घेण्यात आलेल्या विकास कामाची माहिती दिली. दरवर्षी पावसाळ्यात शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या तानाजी गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, भांदूर गल्ली महाद्वार रोड या परिसरात पावसाचे पाणी तुंबून ते घराघरात शिरत होते.
त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. येथील रेल्वेमार्गाच्या ठिकाणी मोठी पाईपलाईन घालून या भागातील पूरपरिस्थितीची समस्या निकालात काढण्यासाठी आखण्यात आलेली योजना गेल्या 20 -25 वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र आता त्याची गांभीर्याने दखल घेऊन ही समस्या दूर करण्यासाठी नुकतीच बेळगाव महापालिका, रेल्वे खाते आणि निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वेमार्ग खालून पाईपलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तानाजी गल्ली कॉर्नर येथे रेल्वे मार्गाच्या ठिकाणी 15 मीटर लांबीची आणि 1.2 मीटर व्यासाची पाईपलाईन करण्यात येणार आहे.
सदर पाईप लाईन घालायचे काम रेल्वे वाहतूक बंद ठेवून सहा तासात पूर्ण केले जाणार आहे असे सांगून रेल्वे मार्गाखालील भूमिगत अशा या पाईपलाईनसाठी सुमारे 2 लाख 35 हजार रुपये खर्च येणार आहे.
मात्र या विकास कामामुळे या भागातील पूर परिस्थितीची समस्या कायमची निकालात निघणार आहे, असे आमदार बेनके यांनी स्पष्ट केले. या विकास कामाबरोबरच या भागातील गटार व ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी विकास कामे हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.