गोरगरीब आणि अनाथ मुलांचे संगोपन करून आपल्या कार्याचा एक वेगळाच आदर्श निर्माण केलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ अर्थात माईंचे निधन झाले आहे. या निधनाने अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशालाही दुःख झाले तसेच ते बेळगाव परिसरालाही झाले आहे. अनेकदा या माईंची छाया बेळगावकरांनी अनुभवली होती.
अनेक कार्यक्रमात त्या बेळगावात दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने बेळगावकर नागरिकांना मंत्रमुग्ध करून सोडले होते. त्यांच्या कार्याची अनुभूती त्यांच्या तोंडातून ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते तर अनेकजण त्यांच्या कार्याने प्रभावित झाले. त्यांना अनुभवायची एक आदर्श संधीच मिळाली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बेळगावातील उपस्थिती संदर्भातील माहितीला पुन्हा उजाळा मिळाला असून सिंधुताईंच्या जाण्याने बेळगावकरांना अपार दुःख झाले आहे.
2011 मध्ये बेळगावला विमल फाऊंडेशन तर्फे भाजप नेते किरण जाधव यांनी महावीर भुवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या आल्या होत्या.वीरमाता जिजाऊ पुरस्कार वितरण माईंच्या हस्ते झाले आणि त्यांनी भरभरून मार्गदर्शनही केले होते.वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला होता.क्रीडा क्षेत्रात यशस्वी काम केलेल्या मुलांच्या आईंना जिजाऊ माता पुरस्कार देण्यात आला होता. ती आठवण आजही ताजी असल्याचे किरण जाधव यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले.
2013 च्या जानेवारी मध्ये प्राथमिक मराठी शाळा मुतगा या शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या.त्यानिमित्त निमंत्रण देण्यासाठी मांजरी येथे गेलेले नारायण कणबरकर बोलत होते.
निरंजन खिचडी, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.सायंकाळी 5 वाजता त्यांचं व्याख्यान झालं.बालकांचे शिक्षण,संगोपन याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. अक्षरशः
मंत्रमुग्ध करून सोडले होते.
त्यावेळी भावुक झालेल्या उपस्थित नागरिकांनी 5 मिनिटात 75 हजार पेक्षा जास्त रक्कम जमा केली होती. या आठवणी त्यांनी सांगितल्या.
एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत व्यक्तीला आपल्या भागात आणून त्यांचा सत्कार करायचा आणि त्यांचे मार्गदर्शन मिळवायचे ही भावना बेळगावकरांमध्ये फार आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात अशा अनेक नामवंत व्यक्तींना बोलावून कार्यक्रम केले जातात. यामागे संबंधित व्यक्तीच्या अनुभवातून स्थानिक व्यक्तींना मार्गदर्शन मिळेल हाच एकमात्र उद्देश असतो. सिंधुताई सपकाळ यांनाही याच उद्देशाने या संस्थांनी बोलावले होते. त्यांच्या जाण्याने बेळगावकरांना तर दुःख झालेच, तर त्यांना बोलावून आणलेल्या या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यक्रमाचे आयोजक यानाही नक्कीच त्यांच्या सहवासाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.
माचीगड सारख्या दुर्गम भागातील मराठी साहित्य संमेलनासह सीमाभागातील कडोली सह अनेक साहित्य संमेलने आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने त्यांनी गाजवली होती.माणसाच्या भावनेला हात घालत त्या आवाहन करत, त्याला प्रतिसाद देत त्यांच्या पसरलेल्या पदरात साहित्यरसिक भरभरून दान टाकत असत. सिंधुताई जरी रूढार्थाच्या शिक्षणापासून वंचित असल्या तरीआपल्या भाषणात इंग्रजी,मराठी, हिंदी शेरो शायरी आणि कविता सादर करत साहित्य रसिकांवर आपले गारुड पसरवत असत.
साहित्याची उत्तम जाण असणाऱ्या सिंधुताईंच्या जाण्याने साहित्य क्षेत्राची देखील अपरिमित हानी झाली आहे.प्रा. ममता सिंधुताईंच या त्यांच्या कन्येच्या रूपाने त्यांनी मराठी साहित्य शारदेला उत्तम गझलकार दिलेली आहे.