आयुष्य हे आपल्याला एकदाच येतं. हे आयुष्य सर्वगुणसंपन्न कसं करता येईल ; माणसाने नवनवं जीवनात शिकत राहून परिपक्व होण्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहेत. वेगवेगळ्या विषयांचे चौफेर ज्ञान घेण्याची लालसा प्रत्येकांच्या अंतःकरणात निर्माण व्हायला हवी. आजच्या काळात जगत असताना आपण सर्व नीतिमूल्ये विसरत चाललो आहोत; ती जोपासून वाढवली पाहिजे. व्यसनांनीं भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली आणि आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून अनेक लोकं जोडली. वास्तववादाकडून परिवर्तनाकडे वाटचाल करणारा साहित्यिक डॉ अनिल अवचट समाजात ज्ञानाचा निरांजन प्रज्वलीत करून समाजाला दिशा देण्याचे कार्य अखंड अविरत केले आहे. समाजामधील वास्तविकतेचे वेळोवेळी लेखन करून समाजभान जागृत करण्याचे आव्हानात्मक जोखमीचे नेहमी काम आयुष्याच्या शेवटपर्यंत केले. चळवळीतून माणूस प्रगल्भ होतो हे दाखवून दिले; याच प्रमाणे नव्या पिढीने समाजसेवेचे व्रत आत्मसात करून सेवा करण्याची जिज्ञासा मनामध्ये निर्माण करायला हवी. प्रा. एन. डी. पाटील, डॉ. अनिल अवचट, सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या श्वासाच्या अखेरपर्यंत कामं केली; आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केलं. माणूस हाच मनस्वी चिंतनाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून प्रत्येकांच्या जीवनात आनंद द्विगुणित कसा होईल हेच पाहिले. लेखनातून आणि व्याख्यानातून सतत समाज प्राबोधन करत राहिले. आपण आणि त्यांची पत्नी डॉक्टर असूनदेखील आपल्या दोन्हीं मुलींना झोपडपट्टीतल्या जिल्हा पंचायतीच्या शाळेत मराठी माध्यमातून मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देऊन प्रवेश मिळविला मातृभाषेचे पटवून दिले; आणि जातीभेदाच्या सीमारेषा मोडून काढल्या. नवा आदर्श जगापुढे निर्माण केला. असे प्रतिपादन *जी. एस.एस. पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद मेणसे* यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघ बेळगाव, समाजवादी प्रबोधिनी बेळगांव, साम्यवादी परिवार , कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ बेळगांव , एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार दिनांक 28/01/2022 रोजी रामदेव गल्ली येतील गिरीष कॉम्प्लेक्सच्या शाहिद भगतसिंग सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “” *मराठी साहित्यातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे जीवनकार्य आणि सामाजिक बांधिलकीतून प्रबोधन चळवळ “* या विषयांवर जी. एस.एस. पदवी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांचे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक, बेळगावचे माजी महापौर ॲड. नागेश सातेरी उपस्थित होते.
व्यासपीठार प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, ॲड. अजय सातेरी, आनंद कानविंदे, कृष्णा शहापूरकर, शिवलिला मिसाळे, मधू पाटील, सुभाष कंग्राळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दुःखद निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट आणि पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते, सीमालढयाचे भीष्माचार्य भाई प्रा. डॉ. एन. डी. पाटील, तसेच ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना मौन पाळून भावपुर्ण श्रध्दांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समाजकार्याचा जागर करण्यात आला.स्वागत कवी प्रा. निलेश शिंदे यांनी केले. प्रास्ताविक कवी प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले.
प्राचार्य डॉ. आनंद मेणसे पुढे म्हणाले ; वास्तववादी लेखक, ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तांगण या सामाजिक संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. अनिल अवचट हे नाव महाराष्ट्राला सर्वपरिचित आहे ते दोन गोष्टींमुळे. एक, त्यांच्या खास ‘अवचट शैली’तील ‘रिपोर्ताज’ या लेखनामुळे आणि दोन, पुण्यात त्यांनी उभ्या केलेल्या ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्रामुळे. अवचटांच्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लेखनानं समाजाला प्रचंड झपाटून टाकलेलं होतं. एखादी सामाजिक घटना वा प्रश्न /समस्या घ्यायची, त्याच्याशी संबंधित सर्व माहिती गोळा करून तीचा नीट अभ्यास करायचा, प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधायचा, आणि मग खास ‘अवचट शैली’त त्याचं संगतवार विश्लेषण करणारा दीर्घ लेख लिहायचा, असं सर्वसाधारण त्यांच्या लेखनाचं स्वरूप म्हणता येईल. असा हा ‘रिपोर्ताज’ हा लेखनप्रकार मराठीत त्यांनी रुजवला, हे नि:संदिग्ध. तरल व संवेदनशील मन, शोधक दृष्टी, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती, असे उपजत गुण असलेल्या अवचटांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. डॉ. बाबा आढावांसारख्या अनेक ज्येष्ठांसमवेत ते महाराष्ट्रभर खेडोपाडी वावरले – फिरले आहेत. एवढेच नव्हे तर एस. एम.
जोशी, आणि जेपी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी बिहारमधल्या पुर्णिया जिल्ह्याचा दौराही केलेला आहे. तसेच पुर्णियात काही काळ राहून तिथल्या एकंदर सामाजिक प्रश्नांचा व स्थितीचा अभ्यासही केलेला आहे. (‘पुर्णिया’ पुस्तकाला नरहर कुरुंदकरांची दीर्घ व विवेचक प्रस्तावना आहे.) समाजातील विविध प्रश्नांवर, घटनांवर, समस्यांवर लिहिताना त्यांच्यातील ‘सच्चा’ सामाजिक कार्यकर्ता जागृत होतो. हाच ‘सच्चा’ कार्यकर्ता त्या त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन खऱ्या वास्तवाचा शोध आणि वेध घ्यायला त्यांना प्रवृत्त करतो.