Monday, November 18, 2024

/

कोल्हापुरातून रॅलीने शिवसैनिक बेळगावला धडकणार

 belgaum

सीमाभागातील मराठी भाषिकांवर राजद्रोहाच्या खटल्यात त्वरित मागे घ्यावेत आणि त्यांना तुरुंगातून मुक्त करावे, या मागणीसाठी शनिवार दि. 22 जानेवारी रोजी कोल्हापूर येथील शिवसैनिक रॅली काढून बेळगावमध्ये धडक देणार आहेत. या आंदोलनात शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर राजद्रोहाचे खटले त्वरित मागे घ्या! या शीर्षकाखाली सदर पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत आहेत. कर्नाटकात बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा कांही कन्नड गुंडाने अवमान केला. देशातील महाराष्ट्रातील व सीमाभागातील मराठी बांधवांनी याचा लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला व या प्रकाराची गांभीर्याने चौकशी कर्नाटक सरकारने करावी अशी मागणी त्यावेळी महाराष्ट्र व सीमा भागातील बांधवांनी केली.

कर्नाटक सरकारने चौकशी तर केलीच वर 61 मराठी भाषिकांवर बेळगाव येथे राजद्रोह व कलम 307 प्रमाणे गुन्हे दाखल करून धरपकड केली आणि सीमाभागातील मराठी बांधवांना तुरुंगात डांबले. अद्यापही त्यांना जामीन मिळाला नाही. उर्वरित जे भूमिगत झाले आहेत त्यांच्यावर ही धरपकड व त्यांचे कुटुंबावर दबावतंत्र सुरू आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय शिवसेना कदापि सहन करणार नाही म्हणून सीमाभागातील बांधवांवरील राजद्रोहचे गुन्हे कर्नाटक सरकारने मागे घ्यावेत व त्यांना तुरुंगातून मुक्त करावे या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने शनिवार दि. 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी पुतळा, टाऊन हॉल कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती अभिषेक घालून कोल्हापूर ते बेळगाव मराठी भाषिकांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दिंडी मार्च व तुरुंग मुक्ती आंदोलन प्रारंभ केले जाईल.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भगव्या पालखीत विराजमान असेल तसेच हा मराठी भाषिकांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान दिंडी मार्च व तुरुंग मुक्ती आंदोलन महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोहोचल्यानंतर सीमाभागातील बांधवांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीवर पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, कुंभी व हिरण्यकेशी या पाच नद्यांचे जल आणून दुग्धाभिषेक घालण्यात येईल आणि नंतर दिंडी सीमा भागाकडे रवाना होईल,

अशा आशयाचा तपशील प्रसिद्धी पत्रकात नमूद बसवून या दिंडीत शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी केले आहे. दरम्यान, बेळगावमध्ये जाताना अडविण्याचा प्रयत्न केला गेला तरी त्याला न जुमानता आम्ही पुढे जाणार आहोत, असे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.