Monday, March 10, 2025

/

खानापुरात मनुष्य -वन्यप्राणी संघर्षामध्ये वाढ

 belgaum

गेल्या कांही वर्षांपासून खानापूर तालुक्यामध्ये वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढीस लागल्याचे दिसून येत असून कांही ठिकाणी वन्य प्राण्यांनी मनुष्य वसाहतीत प्रवेश करून उपद्रव माजवल्याची उदाहरणे आहेत.

खानापूर तालुक्यातील नंदगड, हेम्माडगा आदी गावाच्या ठिकाणी वाघ आणि बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांनी गाई-गुरांवर हल्ला केल्याच्या घटना अलीकडेच घडल्या आहेत. वाघाने नंदगड तसेच हेम्माडगा येथे बैलाला ठार मारले आहे.

त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षात खानापुरातील जंगलानजीक जंगली अस्वलांनी जवळपास 4 लोकांचा जीव घेतला आहे. वन्यजीव कार्यकर्त्यांच्या मते जंगलातील पाण्याचा आणि अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्य प्राणी मनुष्य वसाहतीकडे आकर्षिले जात आहेत.

वन्यजीव कार्यकर्ते संजय कुबल यांनी सांगितले की, निर्बंध घातलेले असताना देखील लोक मनोरंजनासाठी वन्यजीवांचा वावर असणाऱ्या जंगलात प्रवेश करतात. त्यामुळे अनेक वेळा जंगलात आग लागण्याच्या घटना घडल्या असून वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना धावपळ करून घटनास्थळाची आग विझवावी लागली आहे. लोकांकडून पेटविण्यात आलेल्या आगीमुळे फक्त वृक्ष वेलींचे नुकसान होत नाही तर जंगलातील कीटक, सरपटणारे प्राणी, पक्षी, त्यांची अंडी, छोटे प्राणी आदींना त्यात आपला जीव गमवावा लागतो. परिणामी वन्यप्राण्यांना अन्नपाण्याचा तुटवडा भासून ते मनुष्य वसाहतीत अतिक्रमण करतात.

पश्चिम घाटातील पाण्याचे संवर्धन हा आणखीन एक चिंतेचा विषय बनला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस होत असला तरी उन्हाळ्यात हा संपूर्ण प्रदेश कोरडा पडतो. परिणामी जंगली प्राण्यांचे पाण्याच्या शोधार्थ मनुष्य वसाहतीत अतिक्रमण होऊन त्याचे पर्यवसान मनुष्य आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्षांमध्ये होते, असेही कुबल यांनी स्पष्ट केले.Khanapur forest

मनुष्य आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष टळावा यासाठी वनखात्याकडून घनदाट जंगलामध्ये कृत्रिम पाण्याच्या टाक्या आणि तळी निर्माण करण्यात आली आहेत. उन्हाळ्यामध्ये या कृत्रिम टाक्या आणि तळी पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्या वन्य प्राण्यांची तहान भागवतात आणि त्यांना मनुष्य वसाहतीमध्ये घुसण्यापासून रोखतात. खानापूरच्या जंगलातील करंजोळ, शिरोली, कमतगा, नायकोल, किरावळा आदी अनेक ठिकाणी या पद्धतीने पाण्याची तळी आणि टाक्या बांधण्यात आल्या असून हे पाणी साठे वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहेत. परंतु इतके होऊन देखील खानापुरात मनुष्य आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्षाच्या घटना घडतच आहेत.

भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या निर्मितीमुळे येथील वाघ, बिबटे आणि गवी रेड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे हत्ती, गवी रेडे, माकडे आणि जंगली डुक्करांकडून खानापूर जंगल परिसरातील शेती पिकांचे नुकसान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वन्यप्राण्यांचा मानवी वसाहतीत प्रवेश होऊ नये यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु लोकांची जंगलातील घुसखोरी रोखणे अधिक कठीण जात असल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.