Friday, December 20, 2024

/

‘जय किसान’ बाबत चौकशी करून सरकारला अहवाल : जिल्हाधिकारी

 belgaum

गांधीनगरनजीक सुरू करण्यात आलेले जय किसान होलसेल भाजी मार्केटच्या बाबतीत ज्या तक्रारी आहेत त्याची चौकशी करून सरकारला अहवाल पाठविला जाईल आणि तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी झालेल्या खाजगी भाजी मार्केट आणि बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सदस्यांसह शेतकरी आणि समाजसेवकांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. खाजगी भाजी मार्केट असलेल्या जय किसान भाजी मार्केटच्या स्थापनेसाठी परवानगी देताना मयत व्यक्तींच्या नावे एनए ले -आऊट करण्यात आला असल्याचा आरोप आहे.

यासंदर्भात ज्याने चूक झालेली असेल तर त्यांची चौकशी केली जाईल. त्याचप्रमाणे कायद्याचे उल्लंघन करून या खाजगी भाजी मार्केटच्या निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या एपीएमसी, हेस्कॉम, महापालिका आदी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि त्या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस सरकारकडे केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी 85 एकर विशाल जागेत कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ आहे. परंतु अनाधिकृतपणे 2011साली मयत झालेल्या व्यक्तींच्या नावे 2014 साली एनए ले -आऊट करुन जय किसान भाजी मार्केटला कोणी परवानगी दिली? त्यासाठी परवाना कोणी दिला? या प्रश्नाला अधिकाऱ्यांकडे उत्तर नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार कृषी मसुद्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना कांही भ्रष्ट बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे खाजगी भाजी मार्केटच्या स्वरूपात शेतकऱ्यांचा भाजीपाल्याची उचल करण्यासाठी लॉबी तयार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

गेल्या 2019 साली बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीमध्ये खाजगी भाजी मार्केट स्थापण्यास विरोध झाला आहे. तसा ठरावही संमत झालेला असताना कृषी उत्पन्न बाजार पेठ त्याच्या संचालकांनी जय किसान भाजी मार्केट स्थापनेस परवानगी दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.Dc bgm

जय किसान होलसेल खाजगी भाजी मार्केटची बाजू मांडताना भाजी मार्केटचे कार्यवाहक के. के. बागवान यांनी सरकारच्या एपीएमसीसह संबंधित सर्व खात्यांच्या रीतसर परवानगीने जय किसान भाजीमार्केटची स्थापना झाल्याचे स्पष्ट केले. आम्ही कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. शहरात वाहतुकीची समस्या होऊ नये आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी हे खाजगी भाजीमार्केट स्थापण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. जय किसान भाजी मार्केटच्या अन्य एका पदाधिकाऱ्याने यावेळी बोलताना बेंगलोर, मंगलोर आदी बऱ्याच शहरांमध्ये एकापेक्षा अधिक होलसेल भाजी मार्केट आहेत.

शहरात दोन भाजी मार्केट झाल्यामुळे खरेतर कोणतीच समस्या उद्भवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलट दोन भाजी मार्केट असल्यामुळे स्पर्धात्मक दृष्टीकोन वाढवून सुधारणा होतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा पर्याय उपलब्ध होतो असे सांगून सर्व कांही शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यांना त्यांच्या कृषी मालाला ज्या ठिकाणी योग्य भाव मिळतो त्याठिकाणी ते आपल्या मालाची विक्री करू शकतात, असे सांगितले.

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यवाह डाॅ. के. कोडीगौड, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, एपीएमसी व्यापारी सतीश पाटील, बसनगौडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद आदींसह एपीएमसी आणि जय किसान भाजीमार्केटचे सदस्य, शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते बैठकीस बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.