एका निराधार मुस्लीम महिलेला एका ख्रिश्चन महिलेने आश्रय दिला आणि निराधार केंद्रातील त्या मुस्लिम महिलेवर अखेर हिंदू कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले, अशी दुःखद परंतु हिंदू -ख्रिश्चन -मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडविणारी घटना आज घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गेल्या सुमारे 12 वर्षांपूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2009 रोजी सामाजिक कार्यकर्त्या इव्हान लोमॅक्स यांना रुखसाना मन्नुरकर ही 55 वर्षीय महिला शहरातील जुम्मा मस्जिदीजवळ आढळून आली. तेंव्हा निराधार रुखसाना हिला लोमॅक्स यांनी आपल्या लोमॅक्स ओल्ड एज होम या निराधार केंद्रात आसरा दिला. आज रुखसाना मन्नुरकर हिचे वृद्धापकाळाने निधन झाले.
रुखसाना निराधार असल्यामुळे लोमॅक्स ओल्ड एज होमच्या व्यवस्थापकाने अंत्यसंस्कारासाठी हेल्प फाॅर निडी या सेवाभावी संघटनेकडे मदत मागितली.
वृद्धेच्या निधनाची माहिती मिळताच हेल्प फाॅर निडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर हे लागलीच निराधार केंद्राच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आपल्या शववाहिकेतून रुखसानाचा मृतदेह नेऊन त्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यासाठी अनगोळकर यांना विल्सन कर्व्हालो, हनीफ ताशिलदार, अनिल अष्टेकर, मंजू लमानी आणि हेल्प फोर नीडीच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.
या पद्धतीने एका निराधार मुस्लीम महिलेला एका ख्रिश्चन महिलेने आश्रय दिला आणि निराधार केंद्रातील त्या मुस्लिम महिलेवर अखेर हिंदू कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केल्याची दुःखद परंतु हिंदू -ख्रिश्चन -मुस्लिम एकात्मतेचे दर्शविणारी घटना आज लोकांना पहायला मिळाली.