स्पर्धा परीक्षांमधील यश हे जीवनाला उत्तम कलाटणी देणारे असते, असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठातील संगणक विभागाच्या प्रा. डॉ. मल्लम्मा रेड्डी यांनी केले.
बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागतर्फे प्रेरणा महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमाले अंतर्गत ‘स्पर्धा परीक्षांमधील विविध संधी आणि विद्यार्थ्यांची कर्तव्य’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना प्रा. डॉ. मल्लम्मा रेड्डी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ. मनीषा नेसरकर या होत्या. डॉ. रेड्डी पुढे म्हणाल्या आपल्या अंगामध्ये असंख्य सुप्त शक्ती आहेत. जन्मभर त्या सुप्तच ठेवणे हा स्वतःच स्वतःवर केलेला अन्याय आहे. त्या शक्ती व इतर सुप्त सामर्थ्य यांना ओळखून जागृत करणे. त्या अनुरोधाने आपल्या करीयरची दिशा निश्चित करणे ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची पहिली पायरी आहे. आपण ग्रामीण भागातून आलो. आपले शिक्षण आपल्या मातृभाषेतून झाले आहे. आपणास उत्तम इंग्रजी येत नाही असे न्यूनगंड बाळगणे खूप घातक आहे. उलट आपण ग्रामीण भागातून आपले सत्व घेऊन आलो आणि मातृभाषेतून शिक्षण घेतले याचा अभिमान बाळगा.
एक सर्वेक्षण असे सांगते की मातृभाषेतून शिकणारे डॉक्टर होतात, तर इंग्रजी माध्यमातून शिकणारे बहुतांशी वैद्यकीय प्रतिनिधी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतात. अर्थात याला अपवाद आहेतच. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो असेही प्रा. डॉ. मल्लम्मा रेड्डी यांनी सांगितले.
व्याख्यानादरम्यान डॉ रेड्डी यांनी विविध स्पर्धा परीक्षा आणि त्यांची तयारी करण्यासाठीचे कौशल्य याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या स्पर्धांची अनिवार्यता स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यापीठाच्या प्राध्यापकवर्गासह विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.