कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवरील चेक पोस्टच्या ठिकाणी कर्नाटकातील प्रवेशासाठी पोलिसांनी आजपासून लसीच्या दोन डोसांसह आरटी -पीसीआर प्रमाणपत्राची सक्ती सुरु केल्यामुळे आज बहुसंख्य प्रवासी वाहने आणि नागरिकांना सीमेवरचा अडकून पडावे अथवा माघारी जावे लागले.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकात कोरोना संदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. तथापि आज सकाळपासून कर्नाटक गोवा सीमेवरील चेकपोस्ट या ठिकाणी कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी पोलिसांनी अचानक आरटी -पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचा बडगा उचलला. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानादेखील गोव्यातून येणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांना चेकपोस्ट या ठिकाणी अडकून पडावे लागले अथवा माघारी फिरावे लागले. कर्नाटक हद्दीतील प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे संबंधित ठिकाणी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कर्नाटक गोवा सीमेवरील चेकपोस्ट ठिकाणी याआधी कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अथवा आरटी -पीसीआर प्रमाणपत्र सक्तीचे होते. मात्र चेकपोस्टच्या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून लसीच्या दोन्ही डोसांसह आरटी -पीसीआर देखील सक्तीचे करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. गोवा -कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांमधील लोकांना कामानिमित्त दररोज सीमा ओलांडून दोन्ही बाजूला ये-जा करावी लागत असते.
आरटी -पीसीआरच्या नव्या आदेशाची पूर्वकल्पना नसल्यामुळे आज या सर्वांची पंचाईत झाली. त्याचप्रमाणे चेकपोस्ट मार्गे दूरच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना देखील आपल्या इच्छितस्थळी न जाता माघारी परतावे लागले.
या सर्व प्रकारामुळे प्रवाशांमध्ये विशेष करून गोव्याच्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्याच प्रमाणे कर्नाटक पोलिस कर्नाटक पासिंगच्या गाड्यांना मात्र बिनबोभाट प्रवेश देत असल्याचा आरोपही केला जात होता.