सरकारने बेळगावसह म्हैसूर आणि कलबुर्गी येथे नव्या जीनोमी सिक्वेन्स प्रयोगशाळा स्थापल्या असल्या तरी अद्याप त्या कार्यान्वित झालेल्या नाहीत. गेल्या 1 डिसेंबर रोजी या प्रयोगशाळा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप त्या सुरू झालेल्या नाहीत.
कोरोना नमुन्यांच्या जीनोमी सिक्वेन्स तपासणीची जबाबदारी सरकारने नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स (एनसीबीएस) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल सायन्स अँड न्युरोसायन्स (निम्हन्स) या देशातील दोन मातब्बर संस्थांवर सोपविलेली आहे.
मात्र या दोन संस्थांकडून बेळगावमधील प्रयोगशाळेत अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान बेळगावमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
बेळगावात आढळून आलेली ही 885 रुग्णसंख्या आत्तापर्यंतची या तिसर्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. विशेष म्हणजे बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात बीम्समधील जवळपास 20 डॉक्टर्स आणि 45 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.