कामानिमित्त परदेशी गेल्याने परदेशी त्यांची कर्मभूमी झाली तरी त्याने जन्मभूमीचे ऋण नेहमीच मान्य केले. ज्या गावाने आपल्याला घडवले त्या गावाबद्दलची कृतज्ञता म्हणून त्याने आपल्या गावातील वाचनालयाला भरीव आर्थिक देणगी पाठवून दिली आहे. ‘वाचाल तर वाचाल’ या सूत्रावर विश्वास ठेवणारा हा युवक आहे नागराज भरमाजी पाटील.
सध्या अमेरिकेत नोकरी करणारा मच्छे गावचा सुपुत्र नागराज भरमाजी पाटील याने बाल शिवाजी वाचनालयाला 26 हजार रुपयांची मदत केली आहे. ज्ञान करून कष्ट मिळवलेल्या जिज्ञासू व्यक्तीला ज्ञानाची कदर असते. याची प्रचिती नागराज पाटील याने दाखवून दिली आहे.
त्यांच्या मदतीबद्दल वाचनालय शतशः ऋणी आहे, असे विचार मच्छे येथील सार्वजनिक बाल-शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष विनायक चौगले यांनी व्यक्त केले.
मच्छे गावचा युवक नागराज पाटील हा बीटेक मेकेनिकल इंजीनियर असून पदवी संपादन केल्यानंतर अमेरिकेत जाऊन तेथे नोकरीत स्थिरावला आहे. अमेरिकेमध्ये ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आपल्या गावच्या वाचनालयाची बातमी वाचल्यानंतर प्रेरित होऊन त्याने वाचनालयासाठी 26 हजार रुपये पाठवले आहेत. ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवण्यासाठी बेळगाव live देखील एक धागा बनला आहे.
गावातील मुलांसह युवापिढीने वाचनालयाच्या मदतीने चांगले शिकुन गावचे नांव उज्वल करावे असा नागराज याचा मानस आहे. त्याने पाठविलेल्या आर्थिक मदतीतून पुस्तक ठेवण्यासाठी कपाट घेतले जाणार असून इतर सुधारणा करण्यात येणार आहेत. त्याच्या मदतीबद्दल वाचनालय कायम ऋणी राहील, असे वाचनालयाचे अध्यक्ष विनायक चौगुले म्हंटले आहे.