बेळगाव शहरातील गांधी नगरातील जयकिसान भाजी मार्केटला देण्यात आलेला परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून सहकार खात्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, असा आदेश सहकार खात्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आला आहे.
नेगीलयोगी रयत सुरक्षा संघ संघटनेचे राज्य अध्यक्ष धर्मराज गौडर यांनी बेळगाच्या नुतन जय किसान भाजीमार्केट संदर्भात मुख्यमंत्र्यांना गेल्या 20 डिसेंबर रोजी पत्र पाठविले होते. बेळगावातील एपीएमसी शासकीय भाजी मार्केट असताना जयकिसान या खाजगी भाजी मार्केटला परवाना दिल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
तसेच भाजी मार्केटला दिलेला परवाना रद्द केला जावा अशी मागणीही केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेऊन 1 जानेवारी रोजी सहकार खात्याच्या मुख्य सचिव यांना पत्र पाठवले आहे. त्यात परवाना रद्द करण्याच्या मागणीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने नेगीलयोगी संघटनेला याची माहिती दिली आहे.
मुळात जय किसान भाजी मार्केटला परवाना देऊ नये असा ठराव एपीएमसीमध्ये दोन वेळा झाला आहे. त्या ठरावाची प्रत पणन खात्याच्या संचालकांना पाठविण्यात आली आहे. मात्र तरीही पणन खात्याने या भाजी मार्केटला परवाने दिल्याने अलीकडेच जय किसान होलसेल खाजगी भाजीमार्केटचे जोरदार उद्घाटन झाले. होते.
त्यानंतर गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन्ही भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. सध्या एपीएमसी भाजी मार्केटवर परिणाम झाल्याने जय किसानचा परवाना रद्द केला जावा अशी मागणी होत आहे. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयाने आता कारवाईबाबतचा चेंडू सहकार खात्याच्या कोर्टात टोलवला आहे.