बेळगावातील पोलीस मुख्यालय जिल्हा पोलीस सभागृहात आज सोमवारी सकाळी बूस्टर डोस लसीकरण कार्याला प्रारंभ करण्यात आला आहे.
बूस्टर डोस लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ, आमदार अनिल बेनके, जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा लक्ष्मण निंबरगी, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.एस.व्ही. मुन्याळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.आय. पी. गडाद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात बूस्टर डोस मोहिमेचा झाला शुभारंभ
कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स आणि 60 वर्षावरील (व्याधी असणाऱ्या) ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेला आज सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र आले असून आवश्यक तयारीबाबत कळविण्यात आल्यानंतर आजपासून संबंधितांना कोरोना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले नागरिक बूस्टर डोससाठी पात्र असणार आहेत. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, कोरोना काळात कार्यरत कार्यकर्त्यांसह 60 वर्षावरील जेष्ठांना बूस्टर डोस दिला जात आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस कोव्हीशिल्ड किंवा कॉ-व्हॅक्सिन यांचा असेल तर तोच डोस बूस्टर स्वरुपात देण्यात येईल. सरकारी कोविड लसीकरण केंद्रात पात्र असणाऱ्या कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना हा डोस मोफत देण्यात येत आहे. तेंव्हा लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तींनी आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक दाखवून बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.