बेळगाव जिल्हा विस्ताराने मोठा असल्यामुळे त्याचे त्रिविभाजन करणे आवश्यक आहे. मात्र हे काम रेंगाळले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी बेळगाव जिल्हा, अथणी जिल्हा आणि चिक्कोडी जिल्हा अशा पद्धतीने जिल्ह्याच्या त्रिविभाजनाची गरज आहे, असे मत वन तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केले आहे.
अथणी येथे आयोजित एका बैठकीमध्ये मंत्री कत्ती बोलत होते. बेळगाव जिल्हा केंद्रापासून अथणी हा तालुका 150 कि. मी. अंतरावर आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी येणे कठीण जात आहे. याविषयी शासन दरबारी पाठपुरावा करणार असून अथणी तालुक्यातील खोतवाडी, पांडेगाव व तेलसंग ही गावे तर बेळगाव जिल्हापासून तब्बल 250 कि. मी. अंतरावर आहेत. तेथील नागरिकांना विजापूर व अथणी जवळ आहे. त्यामुळे अथणी आणि चिकोडी जिल्हा होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. परंतु मी मुख्यमंत्री पदासाठी दावा करणार नाही. मुख्यमंत्री बोम्मई आपला कार्यकाल पूर्ण करतील. तसेच 2023 मध्ये निवडणुका होतील. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही मंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार महेश कुमठळ्ळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत संचालक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.