सध्या कोरोनाचा धोका पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व निर्बंध कडक करत आहे. या पार्श्वभूमीवर कॅम्प येथील एका शाळेमध्ये लग्नाचा स्वागत समारंभाचे आयोजन करून मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडल्यामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा उचल खाल्ली असून तिसर्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि आरोग्य खाते कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाय योजना करत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कांही शाळांमध्ये मात्र कोरोना नियम धाब्यावर बसविले जात आहेत.
कॅम्प येथील एका शाळेत काल चक्क एका लग्नाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. जूनियर, सीनियर केजीपासून दहावीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरविले जातात. सध्या शाळा देखील सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग तर वाढतच आहे. ही वस्तुस्थिती असताना संबंधित शाळेत स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आल्यामुळे पालकवर्गात सखेद आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करणाऱ्या शाळा आपल्या मुलांसाठी सुरक्षित आहेत असा विश्वास ठेवून पालक आपल्या मुलांना शाळेला पाठवत आहेत. मात्र कॅम्प येथील संबंधित शाळेतील प्रकार पाहता आपली मुले कोरोनापासून सुरक्षित राहू शकतील काय? अशी शंका पालकांना भेडसावू लागली आहे.
तरी प्रशासनासह आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लहान मुलांचा वावर असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये विवाह, स्वागत समारंभ यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालावी. तसेच स्वागत समारंभाचे आयोजन करणाऱ्या कॅम्प येथील संबंधित शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.