Friday, December 20, 2024

/

.. चला सकाळी.. लुटा ‘धुकं पर्यटनाचा’ आनंद!

 belgaum

बेळगाव शहरासह ग्रामीण भागात गुलाबी थंडी वाढू लागली असून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीसह सध्या पहाटेच्या वेळी विशेष करून उपनगरांसह ग्रामीण परिसरात धुक्याची चादर पसरत आहे. परिणामी सध्या पहाटे फिरावयास जाणारी मंडळी ‘धुकं पर्यटनाचा’ आनंद लुटत असून इतरांनाही ते त्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसापासून बेळगाव शहराचा पारा एकदम घसरला असून आज गुरुवारी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत कमी खाली पोहोचले आहे. थंडीमुळे अंगात हुडहुडी भरत असताना पहाटे पडणाऱ्या दाट धुक्यामुळे साऱ्यांना चाचपडत वाट काढावी लागत आहे. तथापि धुक्यामध्ये फिरण्याची मजा काही औरच असल्यामुळे पहाटेच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वाॅर्कर्समध्ये सध्या चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळत आहे. दाट धुक्यामुळे जमीनीवरील गवतासह वृक्ष वेलींवर मोठ्या प्रमाणात मंज अर्थात दव पडत आहे. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात मंज पडत असल्यामुळे गर्द झाडी असणारा परिसर आणि शिवारांमध्ये जणू पाऊस पडल्याचा अनुभव साऱ्यांना येत आहे. मोहक धुक्यामुळे अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

एकंदर हे सर्व वातावरण निसर्ग कवी आणि लेखकांच्या लेखणीला खाद्य पुरवण्यास अत्यंत उपयुक्त आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. पहाटे फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वाॅकर्सपैकी एक असणारे साहित्यिक गुणवंत पाटील यांनी साहित्यिकांच्या लिखाणातून हा निसर्ग पाझरल्यास अधिक वास्तववादी लिखाणाची निर्मिती होईल, असे मत व्यक्त केले आहे. आपली मुले अशा थंडीच्या धुक्याने लपेटलेल्या वातावरणात भल्या पहाटे उठण्यास नाखूश असतात. परंतु हीच वेळ आहे की आपण आपल्या मुलांनाही निसर्गाच्या जवळ घेऊन गेले पाहिजे आणि मातीशी त्यांचे नाते जुळवून दिले पाहिजे. मुलांच्या मानसिकतेसाठी आणि आरोग्यसाठी ते गरजेचे आहे असे सांगून बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर का म्हणतात? हे समजून घ्यायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या भोवतालच्या निसर्गाची श्रीमंती जाणून घेतली की ते नक्की कळेल, असे गुणवंत पाटील यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सध्या निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घेत ‘धुकं पर्यटनाचा’ आनंद लुटण्याचे आवाहन त्यांनी बेळगावकरांना केले आहे.Cold bgm

बेळगाव शहरातील किल्ला,वॅक्सिंन डेपो,रस कोर्स आणि कॅम्प, सावंगाव रोड, येडीयुरप्पा मार्ग सह उपनगर आणि जवळील मार्गावर धुके पडले होते त्याचा आनंद मॉर्निंग वाकर्स नी घेतला आहे.

दरम्यान, पहाटेच्या वेळी दाट धुके पडत असल्यामुळे वाहनचालकांना देखील रस्त्यावरून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. वाहनांचे हेडलाईट सुरू करूनच त्यांना मार्गक्रमण करावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग सारख्या प्रमुख मार्गांवरील रहदारीचा वेग मंदावला होता. वाहनचालकांना समोरचा अंदाज येत नसल्यामुळे वारंवार हॉर्नचा वापर करावा लागत होता. आज पहाटे हलगा, के. के. कोप्प, बागेवाडी याचबरोबर बेळगावपासून भुतररामनहट्टीपर्यंत या धुक्यातूनच वाहनचालकांना वाट काढावी लागत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.