बालाजी स्पोर्ट्स हलगा (ता. जि. बेळगाव) यांच्यातर्फे आयोजित ‘बालाजी ट्रॉफी -2022’ भव्य हाफ-पीच नाईट क्रिकेट स्पर्धेला काल प्रजासत्ताकदिनी दिमाखात प्रारंभ झाला.
पी. बी. रोड, हालगा येथील भरतेश मैदानावर आयोजित या स्पर्धेतील विजेत्या संघास बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्याकडून 50,000 रुपये, उपविजेत्या संघास विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडून 25,001 रु. आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या जी. जी. सिमेंट मच्छे यांच्याकडून 11001 रुपये अशी भव्य बक्षिसे दिली जाणार आहेत.
या खेरीज प्रत्येक सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार हालगा ग्रामपंचायत अध्यक्ष गणपत मारिहाळकर यांनी पुरस्कृत केले आहेत. सदर भव्य बक्षीस रकमेच्या रात्रीच्या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ काल सायंकाळी दिमाखात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
त्यानंतर आमदार हट्टीहोळी यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले आणि त्यानंतर यष्टीपूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अन्य प्रमुख पाहुणे म्हणून हालगा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी, हालगा ग्रा. पं. अध्यक्ष गणपत मारिहाळकर, चेतन कुरंगी, यल्लाप्पा सामजी, राजीव दोड्डणावर, ग्रा. पं. सदस्य सदानंद बिळगोजी, सागर कामानाचे, भुजंग सालगुडे, दिलीप परीट, नजीरसाब मुल्ला, पिराजी जाधव, सीपीआय विजय सिंन्नूर, चंद्रकांत सामजी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आकाशात झालेल्या या फटाक्यांच्या आतषबाजीने परिसरातील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर राष्ट्रगीताने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्पर्धेत सहभागी क्रिकेट संघातील क्रिकेटपटुंसह क्रिकेटप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.