खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा दिनानिमित्त येत्या सोमवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार असून त्यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकाचे आज खानापूर शहरात वाटप करून जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खानापूर तालुक्यातील दोन्ही गटप्रमुखांच्या नावांसह येत्या सोमवार दि 17 जानेवारीच्या हुतात्मा दिन अभिवादन कार्यक्रमाबाबतचे पत्रक प्रसिद्धीसाठी छापण्यात आले आहे. दुभंगलेल्या खानापूर म. ए. समितीच्या दोन्ही गटप्रमुख अनुक्रमे देवाप्पा गुरव आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नावांसह प्रसिद्धीस देण्यात आले असल्यामुळे या पत्रकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याखेरीज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून शनिवारपासून वीकेण्ड लॉक डाऊन जारी होणार आहे. त्यामुळे उद्या व परवा रविवारी सर्व व्यवहार आणि एकंदर जनजीवन ठप्प असणार आहे. हे ध्यानात घेऊन समितीच्या दोन्ही गटाकडून सोमवारच्या हुतात्मा दिन अभिवादनाच्या कार्यक्रमाबाबत खानापूर तालुक्यात सर्वत्र जनजागृती केली जात आहे.
खानापूर शहरांमध्ये देखील आज शुक्रवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा दिन आणि अभिवादनाच्या कार्यक्रमासंदर्भात छापण्यात आलेल्या पत्रकाचे प्रमुख रस्त्यांवर फिरून वाटप केले. त्यावेळी नागरिकांना हुतात्मा दिन कार्यक्रमास आवर्जून हजर राहण्याचे आवाहन केले जात होते.
माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील या जनजागृती मोहिमेत माजी आमदार अशोकराव पाटील यांचे चिरंजीव माजी जि. पं. सदस्य विशाल अशोकराव पाटील, पीएलडी अध्यक्ष मुरलीधर पाटील, यशवंत बिर्जे, रुकमांना झुंजवाडकर, अमृत पाटील, महादेव घाडी, विठ्ठल गुरव, डी. एम. गुरव, विवेक गिरी, प्रकाश चव्हाण, पुंडलिक पाटील, कृष्णा कुंभार, रवी पाटील, आबासाहेब दळवी,प्रवीण पाटील, शंकर पाटील नारायण कापोलकर, मरू पाटील आदींचा सहभाग होता.
महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका यांच्यातर्फे सोमवार दि. 17 जानेवारी रोजी 8:30 वाजता खानापूर स्टेशन रोड येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार आहे. तेंव्हा समस्त मराठी भाषिकांनी हुतात्मा दिनाचे गांभीर्याने आचरण करून सोमवारी कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.