रस्त्यावरून जाणाऱ्या कारगाडीवर संपूर्ण झाड बुंध्यासकट उन्मळून पडल्याची थरारक घटना सुळगा (ता. जि. बेळगाव) गावानजीक वेंगुर्ला रोडवर काल रात्री 11:30 च्या सुमारास घडली असून या जीवघेण्या घटनेत दैव बलवत्तर म्हणून कारमधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही. तथापी कारगाडीचा मात्र चक्काचूर होऊन सुमारे 4 -5 लाखाचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त कारगाडी मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ गडकरी यांच्या मालकीची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी यांचे चिरंजीव तुषार हे काल शनिवारी सायंकाळी आपल्या डेअरीच्या कामासाठी डेअरी मॅनेजर टोपले यांच्यासह आयटेन (क्र. केए 22 एमए 0094) कारगाडीतून तालुक्यातील कावळेवाडी, बिजगर्णी आदी गावांना भेटी देण्यास गेले होते. तुषार आणि टोपले हे उभयता आपला दौरा आटपून माघारी परतत असताना रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला रोडवर सुळगा गावानजीक रस्त्याशेजारील जांभळाचे एक मोठे झाड अचानक बुंध्या सकट उन्मळून त्यांच्या गाडीवर कोसळले.
परिणामी टपावर कोसळलेल्या झाडाच्या अवजड बुंध्यामुळे कारच्या दर्शनीय आणि मागील काचेसह वरील संपूर्ण भागाचा चक्काचूर झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दैव बलवत्तर म्हणून कारगाडीतील तुषार गडकरी आणि त्यांचे मॅनेजर टोपले दोघेही बालंबाल बचावले. किरकोळ दुखापत होण्याव्यतिरिक्त त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. त्यांच्यावर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. झाड कोसळल्यामुळे गडकरी यांच्या गाडीचे सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, भररस्त्यात कार गाडीवर संपूर्ण झाडच उन्मळून पडल्यामुळे वेंगुर्ला मार्गावरील वाहतूक काल रात्री जवळपास दोन-अडीच तास विस्कळीत झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांसह वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच रस्त्यावर कोसळलेले झाड हटविण्याचे काम काम हाती घेऊ रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. कोसळलेल्या झाडामुळे आजूबाजूचे विजेचे दोन -तीन खांब देखील तुटून पडले. त्यामुळे या मार्गासह सुळगे गावातील वीज पुरवठा आज सकाळपर्यंत खंडित झाला होता. सदर घटनेची काकती पोलिसात नोंद झाली आहे.