आर. के. मार्ग, हिंदवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आर. के. मार्ग हिंदवाडी येथील यशकुमार राजेंद्र हनबरट्टी यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक एम. वाय. कारिमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार यशकुमार हे काल बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून कामावर गेले होते. ते इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांची पत्नी कॉलेजला गेली होती. यशकुमार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे आणि कडी-कोयंडा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी लागलीच टिळकवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
यशकुमार यांच्या घरातील 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी, 69 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 5 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. भरदिवसा केवळ अडीच तासात चोरट्यांनी आपला डाव साधला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. टिळकवाडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.