हलगा येथील बेळगाव शहराच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधात आणि अलारवाड येथेच हा प्रकल्प व्हावा, या मागणीसाठी शेतकरी नेते नारायण सावंत आणि अन्य चौघांनी कर्नाटक मुख्य न्यायाधीश यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर दोन वर्षापूर्वी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी येत्या 2 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे. या दाव्याची गांभीर्याने दखल घेऊन न्यायालयाने महापालिकेला सदर सांडपाणी प्रकल्प घोटाळ्याबाबतचे प्रतिज्ञापत्र याचिकाकर्त्यांपर्यंत पोचवावे, त्याचप्रमाणे या संदर्भातील अंतीम अहवाल लोकायुक्त खात्याने पुढील सुनावणीपर्यंत सादर करावा, असे सांगितले आहे.
1985 साली बेळगाव महानगरपालिकेकडून अलारवाड येथील 163 एकर जमिनीमध्ये 8 कोटी रुपये खर्च करून बेळगाव शहरासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. उताराची जमिनीवरील नैसर्गिक प्रवाहामुळे सांडपाणी प्रकल्पासाठी ही जागा योग्य असल्याचा निर्वाळा अभियंत्यांसह तज्ञांनी दिला होता. हा प्रकल्प खरेतर तत्पूर्वी 1972 व 74 साली बेळगाव शिवारामध्ये राबविण्याचा महापालिकेचा विचार होता. मात्र बेळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार आवाज उठवून या प्रकल्पाला विरोध केल्यामुळे तो रद्द झाला होता. त्यावेळी माळ जमिनीत हा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार अलारवाड येथील जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त शेट्टी यांच्या कालावधीत सभागृहात याबाबतचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला होता. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक निधीचे पाणीपुरवठा मंडळापासून संबंधित अन्य खात्यांमध्ये वाटपही करण्यात आले होते. त्यानंतर कांही कारणास्तव हा प्रकल्प रेंगाळला त्यानंतर 2007 -08 साली या प्रकल्पात राजकीय हस्तक्षेप झाला आणि चित्र पालटले. कांही लोकप्रतिनिधीच्या आग्रहास्तव या प्रकल्पाची जागा बदलून ती हलगा नजीकच्या शेतजमिनीत निश्चित करण्यात आली.
हलगा येथील या नियोजित सांडपाणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन नष्ट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आणि न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल करण्याद्वारे दाद मागितली. त्याचप्रमाणे यासंदर्भात नवी दिल्ली येथे जाऊन संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन केंद्र सरकारच्या निधीमध्ये सांडपाणी प्रकल्पाच्या नांवाखाली मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार केली. आता न्यायालयाने लोकायुक्तांना या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा कयास व्यक्त करून त्याबाबत चौकशी अंती अहवाल पुढील सुनावणीप्रसंगी सादर करण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेते नारायण सावंत यांनी बेळगाव महापालिका ने हिशोबाचे प्रतिज्ञापत्र आजतागायत आम्हाला न देता फसवणूक सुरू केली आहे तेव्हा आता लोक लोकायुक्तांच्या माध्यमातून सखोल चौकशी होईल आणि महापालिकेचे पितळ उघडे पडेल तसेच नागरिकांकडून कराच्या स्वरूपात जमा केलेला पैसा हडप करण्याचा डाव उजेडात येईल परिणामी महापालिकेला सांडपाणी प्रकल्पासाठी असणारा पैसा त्या प्रकल्पावरच खर्च करावा अभ्यास भाग पडणार आहे असे सांगून भविष्यात हलगा येथील अन्यायकारक सांडपाणी प्रकल्प निश्चित पणे बंद पडेल असा विश्वास आम्हा शेतकऱ्यांना वाटतो असेही सावंत यांनी सांगितले.