बेळगाव शहरातील रविवार पेठेतील कलमठ रोड या गेल्या सुमारे 6 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्याची पार दुर्दशा झाली असून या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? असा संतप्त सवाल रविवार पेठेतील व्यापारी आणि नागरिकांकडून केला जात आहे.
शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार पेठ येथील करमाड रोड हा रस्ता सध्या खाचखळग्यांनी भरून गेला आहे. गेल्या जवळपास सहा वर्षापासून या रस्त्याची या पद्धतीने दुर्दशा झाली आहे. कलमठ रोड आणि रविवार पेठेतील व्यापारी व नागरिकांनी गेल्या या सहा वर्षात या रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
त्यापद्धतीने संबंधित खात्याचे अधिकारी तर सोडाच परंतु नगरसेवकापासून आमदार, खासदार, मंत्र्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी देखील या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कलमठ रोडची खाच-खळगे पडून दुरवस्था झाली असल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नुकतेच दोघा दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले.
आज तर एका मालवाहू रिक्षाची मागील दोन चाके खड्ड्यात उतरल्यामुळे समोरील चाकाने आकाशाकडे तोंड केल्याची घटना घडली. भर रस्त्यात आकाशाकडे तोंड करून तिरप्या उभ्या असलेल्या या रिक्षामुळे ये -जा करणाऱ्यांचे मनोरंजन झाले तरी ती रिक्षा पूर्ववत जमिनीवर आणेपर्यंत रिक्षा चालक आणि आसपासच्या नागरिकांना नाकीनऊ आले.
सदर रस्ता खराब होण्याबरोबरच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. याकडेही कोणाचेच लक्ष नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी विशेष करून बेळगाव उत्तरचे कार्यतत्पर आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दुर्दशा झालेल्या कलमठ रोडची गांभीर्याने दखल घेऊन तो युद्धपातळीवर दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून केली जात आहे.