कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेशकुमार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काँग्रेस नेते माजी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान आमदार रमेशकुमार यांनी बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभेत बलात्कारावर केलेली टिप्पणी अतिशय धक्कादायक आहे.
या वक्तव्यावरून चहुबाजूने टीकेची झोड उठली आहे. विधानसभेत अध्यक्षांना संबोधित करताना रमेश कुमार म्हणाले की जर बलात्कार रोखणे कठीण असेल तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या. खेदाची बाब ही की काँग्रेस नेत्याने केलेल्या या वक्तव्याला कोणीही आक्षेप घेऊन विरोध केला नाही. एवढेच नव्हे तर लाजिरवाणी गोष्ट म्हणजे त्या वक्तव्यावर विधानसभेत हशा पिकला.
बलात्कार होणारच आहे तर मग झोपा आणि आनंद घ्या, असे लज्जास्पद वक्तव्य करणाऱ्या रमेशकुमार यांच्यावर आता कारवाईची मागणी केली जात आहे. सभागृहात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवरील चर्चेदरम्यान अनेक आमदारांना बोलायचे होते. मात्र गदारोळामुळे त्यांना बोलता आले नाही.
कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती. त्यावेळी उपस्थित आमदार विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे वेळ मागत होते. आमदारांच्या मागणीवर सभापती म्हणाले की, वेळेची कमतरता आहे. प्रत्येकाला वेळ देत राहिलो तर हे सत्र कसे चालेल. काँग्रेस नेते रमेश कुमार यांच्याकडे पाहून तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल असे त्यांनी आमदारांना सांगितले. ते जाऊ द्या, जस सुरू आहे तसेच सुरू राहू दे आणि परिस्थितीचा आनंद घ्या. मी सिस्टिम नियंत्रित करू शकत नाही. माझी चिंता सभागृहाच्या कामकाजाबाबत आहे ते पूर्ण करणे देखील आवश्यक आहे.
वक्त्यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेस नेते रमेशकुमार उभे राहिले आणि उत्तर देताना म्हणाले की, एक म्हण आहे ‘जेव्हा बलात्कार थांबवणे अशक्य असते तेव्हा झोपा आणि त्याचा आनंद घ्या’ या विधानावर आक्षेप घेणे ऐवजी सभापती व सदस्य हसायला लागले. मात्र कालांतराने आपली चूक लक्षात येताच पक्षाचे आमदारच नव्हे तर महिला सदस्यांनी देखील सभागृहात निदर्शने करत त्यांच्या वक्तव्याला विरोध केला.