वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे या वर्षभरात 4 कोटी 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दंड वसुली घट झाली असून त्याला कोरोना संसर्ग, लॉकडाउन आणि विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कारणीभूत ठरले आहे.
संपूर्ण राज्यात कोरोना नियमावली तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून पोलिसांनी एकूण सुमारे 2 कोटी 62 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये यंदा बेंगलोरमध्ये सर्वाधिक 122 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. हुबळी -धारवाड दुसऱ्या स्थानावर असून तेथे 7 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
मंगळूर तिसऱ्या स्थानी असून या ठिकाणी 5 कोटी 90 लाख रुपयांची दंड वसुली झाली आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या म्हैसूरमध्ये 5 कोटी 46 लाख रुपयांचा तर पाचव्या स्थानावर असलेल्या बेळगावमध्ये 4 कोटी 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन आणि कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे. गेल्या 2019 मध्ये बेळगाव शहरात 4 कोटी 84 लाख रुपयांचा दंड वसूल झाला होता, तर मागील वर्षी 2020 मध्ये 5 कोटी 22 लाख रुपयांची दंड वसुली झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दंड वसुली कमी झाली असून 4 कोटी 16 लाख रुपयांचा दंड गेल्या नोव्हेंबर अखेरपर्यंत वसुल झाला आहे.