Saturday, April 20, 2024

/

बेळगावकरांनी घेतला मोकळा श्वास!

 belgaum

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे काल शुक्रवारी सूप वाजले आणि गेल्या 10 -12 दिवसांपासून शहरात नेते व अधिकाऱ्यांच्या कर्णकर्कश वाहनांची वर्दळ, लालबत्त्या, सगळीकडे लागलेली बॅरिकेड्स, पोलिसांची अवाजवी आणि पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर अटक सत्रामुळे निर्माण झालेला तणाव या सर्वांमधून मुक्तता झाल्यामुळे आज शनिवारचा दिवस शहरवासीयांसाठी निवांत ‘रिलीफ’ देणारा ठरला.

कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाची काल शुक्रवारी सांगता झाली. या अधिवेशनासाठी राज्यभरातील आमदार-खासदार आणि वरिष्ठ अधिकारीच नव्हे तर आपल्या मागण्या राज्य सरकार समोर ठेवण्यासाठी राज्यभरातील नागरिकही बेळगावात दाखल झाले होते. त्यामुळे गेल्या 23 डिसेंबर रोजी अधिवेशनाला प्रारंभ झाल्यापासून बेळगावचे नेहमीचे दैनंदिन जीवन बदलले होते. शहरात सर्वत्र नेतेमंडळी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या धूळ उडवत जाताना पहावयास मिळत होत्या. अधिवेशनाच्या 10 दिवसांच्या कालावधीत नेतेमंडळी आणि अतिमहनीय व्यक्तींची ये-जा सुरू असल्यामुळे वाहतूक नियमात युद्धपातळीवर बदल करण्यात आला. अनेक ठिकाणी बॅरिकेट्स टाकून रस्ते अडविण्यात आले, तर कांही ठिकाणच्या रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. अतिमहनीय व्यक्तींच्या वाहनांना वाट करून देण्यासाठी अचानक एखाद्या रस्त्यावरील वाहतूक रोखली जात होती. या सर्व प्रकारामुळे शहरवासियांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहतूक अडविण्यात आल्यामुळे महत्वाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. राज्यातील विविध जिल्ह्यातून आंदोलन करण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे शहराच्या बाजारपेठेत मात्र नेहमीपेक्षा जास्त गर्दी पहावयास मिळाली.

अधिवेशनाच्या धामधूमी बरोबरच महामेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकीचा प्रकार घडला आणि त्या पाठोपाठ बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बेळगावात क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळा विटंबनेचा संतापजनक प्रकार घडला. यामुळे बेळगावातील वातावरण बिघडले. दगडफेक व अटक सत्रामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांची तारांबळ उडाली. या पद्धतीने अधिवेशन काळात शहरात अनेक वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. परिणामी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

एकंदरच अधिवेशनाच्या 10 दिवसांच्या कालावधीत बेळगाव शहराचे शांत आणि संथ जनजीवन घुसळून निघाले होते. मात्र काल शुक्रवारी अधिवेशन समाप्त होताच सर्व गजबजाट आणि धावपळ शांत झाल्यामुळे आजचा शनिवारचा दिवस बेळगावकरांसाठी शांततापूर्ण ‘रिलॅक्स’ करणारा ठरला. गेले 10 दिवस मोर्चे आणि आंदोलनामुळे गजबजून गेलेला सुवर्ण विधानसौधच्या परिसरात देखील आज शुकशुकाट पहावयास मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.