कोरोनाने पुन्हा उचल खाल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन महिने शाळा व महाविद्यालयांमध्ये गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची सूचना केली जाणार आहे. सध्या राज्यातील तीन जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना अशी सूचना करण्यात आली असून इतर जिल्ह्यातील शाळांसाठी लवकरच आदेश जारी होणार आहे.
धारवाड, तुमकुर आणि इतर भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर शिक्षण खात्याने राज्यातील तीन जिल्ह्यांमधील शाळांमध्ये येत्या दोन महिन्यात संस्कृतीक व त्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये, असा आदेश बजावला आहे.
त्यामुळे या भागातील शाळांना पुढील दोन महिने शाळेतील विविध कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. याखेरीज इतर जिल्ह्यांमध्ये देखील शाळा व महाविद्यालयात संस्कृती कार्यक्रम आयोजित करू नका, अशी सूचना लवकरच केली जाणार आहे.
गेले अनेक महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग अभ्यासात गुंतला आहे. आता यापुढे शाळा सुरळीत सुरू राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत असून गेल्या कांही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना फेसमास्क वापरा, अशा सूचना शिक्षकांकडून केल्या जात आहेत.
दरम्यान जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी शाळा सुरु झाल्यापासून सर्व शाळांना कोरोना नियमावलींचे पालन करण्याची सूचना केली आहे. आगामी काळात सरकारकडून ज्या सूचना येतील त्यांची शाळांना माहिती देण्यात येईल. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी फसमास्क वापरावा, असे आवाहन केले आहे.