छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा निषेध करणे हा देशद्रोहाचा गुन्हा कसा होऊ शकतो. देशद्रोहाचा गुन्हा इतका स्वस्त झाला आहे का? असा सवाल महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केला.
कर्नाटक पोलिसांनी बेळगावातील 38 शिवप्रेमी युवकांवर जो राजद्रोह अर्थात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात खासदार राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे 38 शिवप्रेमी तरुण सध्या तुरुंगात आहेत.
त्यांचा गुन्हा इतकाच की बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याचा त्यांनी निषेध केला. धिक्कार केला, रस्त्यावर येऊन आंदोलन केले. जे त्यावेळी महाराष्ट्रात देखील घडले. पोलिसांनी संबंधित तरुणांवर जरूर गुन्हे दाखल करावेत, परंतु त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे म्हणजे अतीच झाले.
छ. शिवाजी महाराजांच्या अवमानाचा निषेध करणे हा या देशातील एका राज्यात जेथे भाजपची सत्ता आहे तेथे देशद्रोहा सारखा गुन्हा होऊ शकतो का? देशद्रोहाचा गुन्हा इतका स्वस्त झाला आहे का? छ. शिवाजी महाराज कोण होते? ते तुम्हाला माहित नाही का? एकीकडे काशीमध्ये प्रधानमंत्री छ. शिवरायांच्या शौर्याचा पुरस्कार करतात आणि त्या छत्रपतींचा भाजपच्या राज्यात अवमान होतो.
लोक रस्त्यावर उतरतात. त्यातील 38 तरुणांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा जो प्रकार घडला आहे त्याची महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईत बसून उगाच हवेत गोळीबार करू नये. खरमरीत पत्र लिहिण्याच्या भानगडीत देखील पडू नये, त्याने काहीही होत नाही. एक तर इथे महाराष्ट्रात कठोर पावले उचलावीत अथवा जे 38 तरुण कारागृहात आहेत त्यांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वकील द्यावा. थोडक्यात महाराष्ट्र सरकारने त्या तरुणांची कायदेशीर बाजू सांभाळावी अशी माझी मागणी आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.