बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारंभापासूनच चुरस होती. या मतदार संघात खरी लढत तिरंगी होणार असल्यामुळे सार्यांचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागून राहिले होते. आता लागलेल्या निकालावरून बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी कुटुंबियांचा वरचष्मा आहे हे सिद्ध झाले आहे.
‘जारकीहोळी कुटुंब जिंकले आणि भाजप पराभूत झाले’ असेच या निवडणुकीचे विश्लेषण करावे लागेल. बेळगाव विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी सर्वाधिक मतानी निवडून आले आहेत.
ते काँग्रेसचे असले तरी त्यांच्या विजयात आमदार सतीश जारकीहोळी यांचा फार मोठा वाटा आहे. चन्नराज हे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू असले तरी त्यांना निवडून आणण्यात आमदार सतीश जारकीहोळी यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यांच्यामुळेच काँग्रेसला विजय शक्य झाला आहे.
दुसरीकडे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी जिंकले आहेत ते आमदार रमेश जारकीहोळी यांच्या करिष्म्यावर जिंकले आहेत. एकंदर जारकीहोळी कुटुंबियांचा या निवडणुकीवर विशेष प्रभाव राहिला आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पराभूत व्हावे लागले आहे. एकंदर बेळगाव विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचा विजय हा खऱ्या अर्थाने जारकीहोळी कुटुंबाचा विजय म्हणावा लागेल.