Tuesday, April 16, 2024

/

बेळगुंदीत साखळी उपोषण

 belgaum

महामेळाव्यातप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यासह काळे फासण्याच्या कृत्याच्या विरोधातील बेळगाव बंदच्या आवाहनानुसार आज मंगळवारी बेळगाव तालुक्यातील गावागावांमध्ये उस्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळण्यात आला. बेळगुंदी येथे तर साखळी उपोषणाद्वारे निषेध नोंदविला गेला.

दळवी यांच्यावरील भ्याड हल्ल्याची तीव्र पडसाद तालुक्यात उमटली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने सदर संतापजनक कृत्याच्या निषेधार्थ दिलेल्या आजच्या बेळगाव बंदच्या हाकेला बेळगुंदी गावात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेळगुंदी गावातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळण्यात आला. याखेरीज ‘त्या’ कृत्याच्या निषेधार्थ बेळगुंदीवासियांनी आज साखळी उपोषण देखील छेडले. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे साखळी उपोषण करण्यात आले. सध्या शेतातील सुगीच्या कामांची धामधूम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी या कामांमध्ये व्यस्त आहेत. तथापि बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनी आपली मराठी अस्मिता आणि एकजूट दाखवून देताना शेतीचे काम बाजूला सारून साखळी उपोषणाच्या सकाळच्या सत्रात सहभाग दर्शविला. त्यानंतर शेतकरीवर्ग शेतीच्या कामासाठी निघून जाताच गावातील नोकरदार मंडळी, व्यवसायिक, दुकानदार आणि युवा कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण पुढे सुरू ठेवले. सदर उपोषण सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार होते. मात्र दुपारी बेळगाव पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, दत्ता उघाडे आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन विनंती केल्यामुळे साखळी उपोषण मागे घेण्यात आले. माजी आमदार किनेकर यांनी दिलेले लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

बेळगुंदी येथील उपोषणामध्ये किरण मोटणकर, ग्रा. पं. सदस्य राजू किनेकर, निवृत्त शिक्षक शंकर चौगुले, शिवाजी शिंदे, पुंडलिक सुतार, दशरथ पाऊसकर, नानासाहेब पाटील, रामचंद्र पाटील, डॉ. व्ही. एम. सातेरी, डॉ. नितीन राजगोळकर, डी. एस. पाटील, अरुण जाधव, रामा अमरोळकर, यल्लाप्पा चव्हाण, इराप्पा निलजकर, नागेश पाटील, सुभाष मरूचे अजित झंगरूचे, वैभव सुतार, गोविंद बागीलगेकर, विनायक चौगुले, सोमनाथ सुतार, आनंद जाधव, सुरेश किनेकर, यल्लाप्पा गावडा, लक्ष्मण आमरोळकर, सागर जाधव, शिवाजी चिरमुरकर, प्रसाद बोकडे आदींसह गावातील शेतकरीवर्ग, युवक आणि सर्व थरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग दर्शविला होता.

 belgaum

बेळगुंदीसह उचगाव, बेकीनकेरे, अतिवाड, गोजगे, मण्णूर, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी, मुतगा, हिंडलगा, कल्लेहोळ, सुळगे, बसूर्ते, देसूर, किणये, बिजगर्णी, राकसकोप, बेळवट्टी, बोकनूर आदी तालुक्याच्या सर्व भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या गावांमधील नागरिकांनी आपापले सर्व व्यवहार आज दिवसभर बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळला. त्यामुळे या गावांतील नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या रस्त्यांवर सर्व दुकाने बंद असल्यामुळे आज शांतता व शुकशुकाट दिसत होता.

विशेष म्हणजे ग्रामीण भागातील खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी देखील आपली वाहने बंद ठेवून बेळगाव बंदला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता. काल दगडफेक झाल्याने आज ग्रामीण भागातील बससेवा देखील बंद ठेवण्यात आली होती. या पद्धतीने कडकडीत बंद पाळून बेळगाव तालुक्यातील समस्त मराठी जनतेने आपण महाराष्ट्र एकीकरण समिती व दीपक दळवी यांच्या पाठीशी आहोत हे आज जणू दाखवून दिले आहे. एकंदर शहराच्या तुलनेत बेळगाव ग्रामीण भागात ‘बंद’ 100 टक्के यशस्वी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.