महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांचे शिष्टमंडळ नवी दिल्लीला जाऊन धडकले आणि विविध मागण्यांसाठी अनेक खासदार, मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली. एकंदर सीमावर्ती भागात यामुळे चैतन्याचे वातावरण पसरले असून युवा कार्यकर्ते करत असलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समितीचे युवा कार्यकर्ते दिल्लीला पोहोचले पण त्याचे फलित काय? याचा विचार केला असता, पहिली गोष्ट म्हणजे यावेळी गेलेले हे शिष्टमंडळ तगडे सळसळत्या रक्ताचे असून ते विशेष हेतूने गेले आहे. त्यांनी अनेक खासदार, केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सीमाप्रश्न दिल्ली दरबारात ऐरणीवर आणण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. आजवर गेल्या 65 वर्षात एका दमात एवढे काम कधीही झालेले नव्हते.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे मंत्री मुक्तार नकवी यांना दिलेले पत्र असो किंवा त्यापुढे शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने नकवी यांची भेट घेणे असो. यामुळे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय मुंबईत येणे ही सीमावर्ती मराठी भाषिकांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. कारण इथून पुढे आपली बाजू थेट मांडणे सीमावासियांना सुलभ होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध वाचा फोडता येणार आहे. महाराष्ट्राचा प्रश्न किंवा सीमावर्ती भागाचा प्रश्न ज्या पद्धतीने समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी मांडला आहे त्याला तोड नाही. याद्वारे दिल्लीत जाऊन त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
फक्त भाषिक प्रश्नाबाबत आवाज न उठवता त्याबरोबरच शेतकऱ्यांचा प्रश्न, दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याचा प्रश्न, मराठी माणसावर सीमाभागात होणारे अन्याय -अत्याचार, रस्त्यांची समस्या किंवा दिशादर्शक फलकाचा प्रश्न असे एकंदर सर्व प्रश्न एका दमात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्याची बहुमोल कामगिरी युवकांच्या या शिष्टमंडळाने केली आहे. आजवर केवळ महाराष्ट्रात जाऊन हारतुरे घेऊन चमकोगिरी करून काही कार्यकर्ते बेळगावला परत येत होते. या प्रकाराला फाटा देऊन केवळ सीमाप्रश्नाशी बांधिलकी राखून दिल्लीला जाण्याचे या शिष्टमंडळाचे प्रयोजन अत्यंत महत्त्वाचे तसेच आदर्शवत असे आहे.
आज या युवा कार्यकर्त्यांमुळे सीमाप्रश्न निश्चितपणे दिल्ली दरबारात पोचला आहे. यामध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांचे नेतृत्व झळाळून उठले आहे. तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांची सौम्य आणि निश्चय भूमिका, तर पियुष हावळ यांच्यासारख्या एका अभ्यासू व नेटकेपणाने आपली भूमिका मांडणारा कार्यकर्ता. या सर्वांमुळे दिल्लीचे मोहीम समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने फत्ते केली आहे.एखादे काम कसे करावे? आपला मुद्दा नेटकेपणाने कसा संबंधितांपर्यंत पोहोचवावा? आपले म्हणणे मुद्देसूद रितसर कसे मांडावे? याचे आदर्शवत उदाहरण या युवा कार्यकर्त्यांनी घालून दिले आहे.
समितीचे नेते मंडळीही या युवकांच्या कार्यामुळे समाधानी दिसत आहेत. बेळगावसह समस्त सीमावासीय देखील त्यांच्याकडे अभिमानाने पाहत असून ते सर्वांचे आशास्थान बनले आहेत. त्यामुळे भविष्यात या युवकांच्या खांद्यावरील जबाबदारी वाढणार हे निश्चित आहे.