कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला पूर्णपणे विरोध करुन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांना काळे फासण्याचा प्रकार आज घडला. या विरोधात संपूर्ण बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व घटकांनी मंगळवार दिनांक 13 रोजी बेळगाव शहरात संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
मागील दहा वर्षांपासून कर्नाटकात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्यात येतो. महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी सीमावासीय जनता महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी मात्र महामेळावा होण्यास विरोध करण्यात आला. परवानगी नाकारून मेळावा होत असलेल्या ठिकाणी दडपशाही करण्यात आली. त्या विरोधात घोषणा देण्यात येत असतानाच काही कन्नड गुंडांचा माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासण्याचा प्रकार घडला असून या विरोधात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.
त्या विरोधात मंगळवारी संपूर्ण सीमाभाग, खानापूर तालुका, निपाणी तालुका, बेळगाव बरोबरीने इतर परिसरात बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी दिली आहे.