बेळगाव महानगरपालिकेच्या नुतन नगरसेवकांच्या शपथविधीला मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य महापौर -उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 ते 11 जानेवारी दरम्यान बेळगावच्या नव्या नगरसेवकांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक गेल्या सप्टेंबर महिन्यात झाली. त्यानंतर तब्बल 3 महिने उलटले तरी अद्यापपर्यंत नूतन नगरसेवकांचा शपथविधी झालेला नाही. मात्र त्यांची नावे गॅझेटमध्ये नोंद झाली आहेत. गॅझेटमधील नांव नोंदणीमुळे या सर्व नगरसेवकांना अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार मिळाला होता. आता बेळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
महापौर-उपमहापौर निवडणूक कोणत्या वर्षाच्या आरक्षणानुसार घ्यायची याबाबतचे स्पष्टीकरण शासनाकडून करण्यात आलेले नाही. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साधारण 11 किंवा 12 जानेवारी रोजी ही निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे महापौरपद सामान्य वर्गासाठी आणि उपमहापौरपद सामान्य महिला वर्गासाठी आरक्षित करण्यात येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. परंतु महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत अद्याप महापालिकेला अधिकृत पत्र किंवा शासनाकडून कोणतीच सूचना आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महापौर -उपमहापौर आरक्षणाचा वाद प्रलंबित असताना निवड कशी होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. आरक्षणाबाबतचे स्पष्टीकरण नगर विकास खात्याकडे विचारण्यात आले आहे. परंतु नगरविकास खात्याकडून याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. शासनाकडून स्पष्टीकरण झाल्यानंतरच महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. तसेच ही निवडणूक प्रादेशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार असून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठवून निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीची तारीख ठरविण्यास महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तथापि येत्या 12 जानेवारी रोजी निवडणूक घेण्यासाठी महापालिकेने तयारी चालवली असल्याची चर्चा असून त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीबाबत औत्सुक्य वाढले आहे.