Monday, January 13, 2025

/

राजद्रोहाचा गुन्हा : महाराष्ट्राने दखल घेण्याची मागणी

 belgaum

बेंगलोर येथे झालेल्या छ. शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या बेळगावच्या 38 मराठी तरुणावर कर्नाटक पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल प्रकरणी महाराष्ट्र शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

बेंगळुरू येथे छ. शिवरांयाचा पुतळ्याचा अवमान केल्या प्रकरणी तमाम शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या, तशाच पद्धतीने बेळगाव येथे मराठी तरुणांनी आंदोलन छेडून संताप व्यक्त केला. राष्ट्रपुरुष शिवरांयाच्या अवमान लक्षात घेता कन्नड प्रशासनाने हा प्रश्न संयमाने न हाताळता 38 मराठी युवकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही बाब संतापजनक असून शिवभक्तांच्या भावनांना ठेच लावणारी आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य शासन अजून गप्प कसे?असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे.

तरी महाराष्ट्र शासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन कर्नाटक शासनावर दबाब टाकावा. लोकशाही मार्गाने गेली 65 वर्षे मराठी भाषिक सीमाप्रश्नी लढा देत असून कन्नड राज्यकर्ते शत्रूराष्ट्र नागरिकांप्रमाणे मराठी भाषिकांना वागणूक देत आहेत.

त्यात भर म्हणून आता मराठी तरुणांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांनी कहर केला आहे. तरी सर्व राजकीय पक्षांनी भावनानिवेश विसरून ‘महाराष्ट्र बंद’ हाक द्यावी आणि सीमावासीयांच्यापाठीशी 12 कोटी मराठी भाषिक आहेत हा विश्वास द्यावा. अन्यथा शिवभक्तांचा उद्रेक होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची राहील, असा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

सदर निवेदनावर
राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, बबनराव रानगे, ॲड. गुलाबराव घोरपडे, शशिकांत पाटील, कादर मलबारी, आनंद म्हाळूंगकर, बाबूराव बोडके, शंकरराव शेळके, शाहिर दिलीप सावंत, प्रताप नाईक, राजू बाणदार, अशोक माळी, शिवमुर्ती झगडे, चंद्रकांत कांडेकरी आणि अवधूत पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाची प्रत गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ यांना देखील काढण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.