कडक तपासणीसाठी चर्चेत आलेल्या कर्नाटकाच्या कोगनोळी चेक पोस्ट बद्दल सगळीकडे जोरदार चर्चा झाली. विनोद झाले, तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोगनोळीत होणार यासारख्या अफवाही पसरल्या. मात्र आता कोगनोळी पाठोपाठ महाराष्ट्राचे कागल चेक पोस्ट ही तितकेच ऍक्टिव्ह झाले आहे.
शनिवारी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या, दोन लस नसणाऱ्या आणि आरटीपिसीआर चाचणी न केलेल्या नागरिकांच्या गाड्या कागल चेक पोस्ट वरुन परत पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोगनोळी बरोबरच कागल चेक पोस्ट ही तितकेच कडक झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र केरळमधून प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिल्यानंतर सर्वात प्रथम कोगनोळी चेक पोस्ट ऍक्टिव्ह झाले.
या ठिकाणी वाहन चालकांना थांबवून मोठ्या प्रमाणात चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर मोठा गहजब उठला. कोरोना आला की सर्वात जास्त तपासणी ही कोगनोळी टोल नाक्यावर किंवा तेथील चेकपोस्टवर होते. अशा प्रकारे नागरिकांनी चेष्टा करण्यास सुरुवात केली .
मात्र आता महाराष्ट्र सरकारने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली असून कर्नाटकाकडून महाराष्ट्रकडे जाणाऱ्या अनेक वाहनांना कागल चेक पोस्टवर थांबवून तपासणी जोरदार सुरू करण्यात आली आहे. शनिवारी याचा अनुभव अनेक वाहनचालकांना आला असून कोणत्याही प्रकारची तपासणी किंवा दोन लसीचे प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना पुन्हा परत पाठविण्यात आले आहे.
त्यामुळे कोरोनाचे संकट टाळण्यासाठी कर्नाटकाबरोबरच आता महाराष्ट्र सरकारही ही पूर्णपणे कामाला लागल्याचे दिसून येत आहे.