कर्नाटकात आत्तापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटचे 19 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन येत्या 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी 2022 पर्यंत राज्य सरकारने सामूहिक कार्यक्रमांवर राज्यव्यापी बंदी घातली आहे.
ख्रिसमस सण साजरा करताना प्रार्थना वगैरे कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून चर्चच्या आवारातच आयोजित केले जावेत. प्रार्थनेसाठी अथवा सण साजरा करण्यासाठी सार्वजनिक जागा, रस्ते, उद्याने आदींच्या वापरावर बंदी असेल. नववर्षाच्या स्वागतासाठी येत्या 30 डिसेंबर ते 2 जानेवारी 2022 पर्यंत खालील मार्गदर्शक सूची राज्यभरात जारी असणार आहे.
1)कोणत्याही खाजगी जागेत अथवा क्लब, पब, रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये डीजे, ऑर्केस्ट्रा, सामूहिक नृत्य आदी विशेष कार्यक्रमांवर बंदी असेल. 2) रस्ते, उद्याने, मैदाने आदींवर सामुहिकपणे नववर्ष साजरे करण्यावर अथवा नववर्ष स्वागत कार्यक्रम आयोजनावर बंदी असणार आहे. 3) रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब, आदी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून नेहमीप्रमाणे सुरू ठेवता येतील. मात्र तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असणार आहे. 4) कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेस्टॉरंट, हॉटेल, क्लब आदी ठिकाणी प्रवेश दिला जावा.
5) निवासी संकुल अर्थात अपार्टमेंटमध्ये नववर्ष स्वागत कार्यक्रमांना परवानगी असेल. मात्र तेथे कोरोना नियमांचे सक्तीने पालन केले जावे. त्याचप्रमाणे डीजे सारख्या विशेष कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी राहील.
तथापि सामूहिक नृत्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील. कार्यक्रमाच्या आयोजनात दरम्यान कोरोना नियमांचे काटेकोर पालन होईल याची जबाबदारी आयोजकांची असेल.
6) सरकारने गेल्या 3 जुलै 2021 रोजी काढलेल्या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आदी सार्वजनिक ठिकाणी फेसमास्क, सामाजिक आंतर आदी नियमांचे पालन करणे सक्तीचे असणार आहे.