अत्यंत खराब झालेल्या बाची -वेंगुर्ला रस्त्यावर अलीकडे सातत्याने अपघात घडत असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
अलीकडच्या काळात बाची -वेंगुर्ला रस्ता खाच-खळगे पडण्याबरोबरच डांबरीकरण पूर्णपणे उखडल्यामुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
उखडलेले डांबरीकरण आणि खड्ड्यांमुळे आज या रस्त्यावर एका ट्रॅक्टर ट्रेलरला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणाला गंभीर इजा झाली नसली तरी ट्रॅक्टरपासून निखळून ट्रेलर रस्त्यावर उलटून पडला. परिणामी काही काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
खराब रस्त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना विशेषकरून दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.
रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. तरी लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन युद्धपातळीवर या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.