सीमाभागात आणि संपूर्ण कर्नाटकात सध्या जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांना कारण काँग्रेसच असून काँग्रेस पक्षाचा या राजकारणामध्ये फार मोठा हात आहे.
राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला काळे फासणे असो किंवा पुतळ्यांची मोडतोड असो या साऱ्यामध्ये काँग्रेसच कारणीभूत असून त्याच्या मागे काँग्रेसचा फार मोठा हात आहे. हे नाट्य रंगवण्यात के पी सी सी चे अध्यक्ष डी के शिवकुमार दिग्दर्शकाची भूमिका निभावत आहेत. असा गंभीर आरोप भाजप नेते, विद्यमान आमदार आणि भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस सी टी रवी यांनी केला आहे .
समितीच्या महामेळाव्यात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासण्यात आले. त्यानंतर निषेधाच्या माध्यमातून शिवसेनेने कन्नड ध्वज जाळला. याविरोधात चित्रदुर्ग येथे शिवसेनेच्या ध्वजाच्या नावाखाली भगवा ध्वज जाळण्यात आला. शिवाय बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले. यामुळे बेळगावातील वातावरण बिघडले आणि बेळगावात संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली.
एकंदर साऱ्या नाट्य मध्ये काँग्रेसचा फार मोठा हात असून याची गंभीर दखल घेतली जावी अशी मागणी सी टी रवी यांनी केली आहे. या आरोपावर आता काँग्रेस काय उत्तर देणार हा प्रश्न आहे. काँग्रेसचे नेते आणि केपीसीसी चे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्यामुळे कर्नाटकात याची जोरदार चर्चा होत असून आता डी के शिवकुमार किंवा अधिकृतरित्या काँग्रेस यावर कोणते उत्तर देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.