विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आज दुपारी अर्धे मतमोजणी झाली त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी हे आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 700 मतांनी आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल करत होते.
बेळगाव विधान परिषद निवडणुकीच्या दोन जागांसाठी चिकोडीच्या आर. डी. हायस्कूल येथील मतमोजणी केंद्रात मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारी 1 -1:15 वाजण्याच्या सुमारास मतमोजणी अर्ध्यावर पूर्ण झाली असताना काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी यांना 2645 मते पडली होती. तसेच अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांना 1945 मते तर भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना 1100 मते पडली होती.
या पद्धतीने आपल्या नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे कवटगीमठ यांच्यापेक्षा हट्टीहोळी 700 मतांनी पुढे होते. बेळगावच्या गुप्त मतदानातील 2 मतांचे प्रकटीकरण झाल्यामुळे ती मते बाद ठरविण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने 1 भाजप मत आणि 1 अपक्ष मत अशी दोन मते फेटाळून लावली आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला आज दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. अटीतटीच्या लढतीमुळे प्राधान्य मते गृहीत धरली जाणार असल्यामुळे निवडणूक निकालास विलंब झाला आहे. जो उमेदवार एकूण मतांच्या 50 टक्के मते मिळवेल आणि ज्याला पहिले प्राधान्य मत मिळेल तो उमेदवार पहिल्या फेरीत विजयी होणार आहे. जर तसे झाले नाही तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या या पद्धतीने प्राधान्य मतासाठी निकाल लागेपर्यंत मतमोजणी सुरूच राहणार आहे.
बेळगाव ऐवजी चिकोडीत मतमोजणी सुरू झाली आहे पहिल्या फेरीत हट्टीहोळी यांचा विजय जवळपास आला आहे त्रिशंकू लढतीत काँग्रेसचे हट्टीहोळी यांनी बाजी मारलेली दिसत आहे. सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कॉम्बिनेशन वर्क आऊट झालेले दिसत आहे.