अधिवेशन आणि आंदोलनामुळे सध्या बेळगावचे राजकीय वातावरण तापले असले तरी थंडीने शहरवासीय मात्र गारठले आहेत. गेल्या दोन दिवसात बेळगावचा पारा सारखा खाली घसरत असून आज शहर परिसरातील तापमान 10.8 सेल्सियस इतके झाले आहे. त्यामुळे बाजारात गरम कपड्यांना मागणी वाढली असून खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.
गेल्या कांही दिवसांपासून शहर परिसरात यातील थंडीत वाढ झाली आहे. सध्या दिवसा भरदुपारी देखील थंडी जाणवू लागली आहे. दरवर्षी ऑक्टोबर अखेरपासून थंडीला सुरुवात होते. मात्र यावर्षी नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस पडल्याने थंडी गायब झाली होती. मात्र आता थंडी पडू लागली असून गेल्या दोन दिवसात हवेतील गारठा वाढला आहे. बेळगावचे सर्वसामान्य तापमान 26.6 सेल्सियस इतके आहे. मात्र गेल्या सोमवारपासून शहराचे तापमान घसरले असून सोमवारी शहर परिसराचे तापमान 13.2 सेल्सियस, मंगळवारी 11.8 सेल्सियस आणि आज बुधवारी 10.8 सेल्सियस इतके कमी झाले आहे.
थंडीचा कडाका वाढल्यामुळे शहर विशेषकरून उपनगर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेष करून सर्दी, ताप, खोकला व फ्लूसारख्या आजाराने तोंड वर काढण्यास सुरुवात केली आहे. बोचऱ्या थंडीमुळे घरातील ठेवणीतील गरम कपडे नागरिकांनी बाहेर काढले असून सायंकाळनंतर जेष्ठ नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.
दरम्यान, वाढत्या थंडीमुळे बाजारपेठेत गरम कपड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे गरम कपड्यांची दुकाने आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडे गरम कपडे खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. थंडीचा मोसम सुरू झाल्यामुळे गरम कपड्यांची मागणी वाढली असून दर देखील जवळपास 45 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती शहरातील बसवान गल्ली कॉर्नरवरील क्लासिक ऑल-इन-वन या खास करून गरम कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानाचे मालक सागर कबाडी यांनी दिली.
कबाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या वुलन स्वेटरचे दर कॉलिटी आणि पॅटर्ननुसार 350 रुपयांपासून 5 ते 6 हजार रुपयापर्यंत आहेत. गरम जॅकेट्सचे दर 400 रुपयापासून 3 हजार रुपयापर्यंत आहेत. घरगुती स्वेटरसह जॅकेटमध्ये हूड जॅकेटला युवावर्गाकडून जास्त मागणी आहे. गरम कानटोप्या 60 रुपयापासून 120 रुपयापर्यंत उपलब्ध असून वुलन हातमोजांचे दर 80-90 ते 500-600 रुपयांपर्यंत आहेत. त्याचप्रमाणे वूलन सॉक्सचे दर 80 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. या सर्व गरम कपड्यांसह आपल्याकडे थंडीमध्ये गुडघ्याला घालायचे वुलनचे निकॅप, आजीबाईंसाठी ब्लाऊज आदी गोष्टीही उपलब्ध असल्याचे सागर कबाडी यांनी सांगितले.