कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असून अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या 4 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची निवासाची सोय निलजीसह विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सुमारे 4,500 पोलीस शहरात येणार असून त्यांच्यासाठी निलजी येथे प्रशस्त खुल्या जागेमध्ये भव्य असे तात्पुरते निवासी वसतिगृह उभारण्यात आले आहे.
या ठिकाणी 1800 पोलीसांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी शौचालय स्नानगृह आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शामियान्यामध्ये 300 अधिकाऱ्यांसह 1800 जण बसू शकतात.
निलजी खेरीज एअरमन ट्रेनिंग स्कूल सांबरा येथे 500, एमएलआयआरसी कॅम्प येथे 400 आणि केएसआरपी मच्छे येथे 250 महिला कर्मचाऱ्यांसह पीटीएस कंग्राळी येथे 350 महिला कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.