विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील दोन जागांसाठी एकूण 8,849 मतदारांपैकी 8,846 जणांनी मतदानाचा हक्क बजावलामुळे जिल्ह्यात एकूण 99.97 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांपैकी खानापूर तालुक्यात 100 टक्के मतदान झाले असले तरी बेळगाव तालुक्यात एकाने मतदानाचा हक्क न बजावल्यामुळे 99.91 टक्के इतके कमी मतदान झाले. संबंधित राहून गेलेले एक मत कोणाचे आहे? याचा खुलासा तूर्तास झाला झालेला नाही.
विधान परिषदेच्या बेळगाव मतदार संघातील दोन जागांसाठी आज मतदान प्रक्रिया उस्फूर्त प्रतिसाद शांततेने पार पडली. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांतील जवळपास सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह महापालिकेतील नगरसेवक आणि आमदारांना मतदानाचा अधिकार होता.
बेळगाव जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ता. पं. आणि जि. पं. सदस्यांना मात्र आजच्या मतदानापासून वंचित रहावे लागले. तथापि मतदानाची टक्केवारी 99 टक्क्याहून अधिक होती. बेळगाव तालुक्यातील 570 पुरुष आणि 526 महिला अशा एकूण 1096 मतदारांपैकी आज 1095 जणांनी मतदान केले. या ठिकाणी एका मतदाराने आपला मतदानाचा अधिकार न वापरल्यामुळे एक मत कमी पडून मतदानाची टक्केवारी 99.91 टक्के इतकी झाली. संबंधित एक मत कोणाचे राहून गेले याचा खुलासा तूर्तास झालेला नाही. या एका मतामुळे निवडणूक निकालाचे चित्र पालटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आज बोलले जात होते.
खानापूर तालुक्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान झाले. या ठिकाणच्या 296 पुरुष आणि 347 महिला अशा एकूण सर्व 642 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बेळगाव तालुक्याव्यतिरिक्त अथणी आणि रामदुर्ग तालुक्यामध्ये देखील प्रत्येकी एका मतदाराने आज आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. विधान परिषदेच्या दोन जागांसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात आज झालेले मतदान (अनुक्रमे तालुका, एकुण मतदार आणि झालेले मतदान यानुसार) खालीलप्रमाणे आहे.
निपाणी : 534 पैकी 534 (100 टक्के), चिक्कोडी -सदलगा : 718 पैकी 718 (100 टक्के), अथणी : 797 पैकी 796 (99.89 टक्के), कागवाड : 202 पैकी 202 (100 टक्के), रायबाग : 731 पैकी 731 (100 टक्के), हुक्केरी : 931 पैकी 931 (100 टक्के), मुडलगी : 368 पैकी 368 (100 टक्के), गोकाक : 684 पैकी 684 (100 टक्के), बेळगाव : 1096 पैकी 1095 (99.91टक्के), खानापूर : 642 पैकी 642 (100 टक्के), कित्तूर : 233 पैकी 233 (100 टक्के), बैलहोंगल : 571 पैकी 571 (100 टक्के), सौंदत्ती : 353 पैकी 353 (100 टक्के), राम्दुर्ग 589 पैकी 588 (99.83 टक्के). या पद्धतीने जिल्ह्यात एकूण 511 मतदान केंद्रांवर 4,201 पुरुष आणि 4,638 महिला अशा एकूण 8,849 मतदारांपैकी पैकी 8,846 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
थोडक्यात जिल्ह्यात 100 पैकी एकूण 99.97 टक्के मतदान झाले. मतदान शांततेत पार पडावे यासाठी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.