Sunday, November 17, 2024

/

शहरासह तालुक्यात कडकडीत हरताळ! : बंद 100 टक्के यशस्वी

 belgaum

महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी पोलिस संरक्षणात भ्याड हल्ला करून काळे फासण्याचा निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बेळगाव बंदला आज बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत हरताळ पाळला. तसेच दळवींवरील भ्याड हल्ल्याचा चौका चौकातील माहिती फलकांच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करून काळे फासण्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बेळगाव बंदला शहर उपनगरांसह तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बापट गल्ली, पांगुळ गल्ली, रविवार पेठ, कांदा मार्केट, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार काकती वेस रोड या प्रमुख बाजारपेठसह शहराच्या विविध भागातील मराठी भाषिक व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांनी आज आपापले व्यवहार बंद ठेवून बेळगाव बंदला संपूर्ण पाठिंबा दर्शविला. त्यामुळे नेहमी गजबजलेले असणाऱ्या या रस्त्यांवर सकाळी शुकशुकाट होता, तर दिवसभर तुरळक गर्दी होती. शहराप्रमाणे शहापूर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ आदी उपनगरी भागातील मराठी भाषिकांनीही आपली दुकाने -उद्योगधंदे बंद ठेवून दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदविला.Belgaum band

मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी 14 डिसेंबर रोजी रोजी कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन समस्त सीमावासियांना करण्यात आले आहे. त्यालाच अनुसरून बेळगाव तालुक्यातील मराठी भाषिकांनी देखील दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध करून बेळगाव बंदला संपूर्ण पाठिंबा दिला. गजबजलेल्या येळळूर बेळगुंदी, उचगाव, कंग्राळी खुर्द, हिंडलगा आदी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून गावकऱ्यांनी बंदला 100 टक्के प्रतिसाद दिला. कंग्राळी खुर्द गावामध्ये कडकडीत बंद पाळून निषेध करावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती कंग्राळी खुर्दकडून करण्यात आले होते. सदर आवाहनाला कंग्राळीवासियांनी आज उस्फूर्त प्रतिसाद देऊन आपापले व्यवहार बंद ठेवण्याद्वारे कडकडीत हरताळ पाळला. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्यामुळे येळळूर, बेळगुंदी, उचगाव, हिंडलगा व कंग्राळी खुर्द गावातील नेहमी गजबजलेल्या असणाऱ्या रस्त्यावर सकाळपासून शुकशुकाट पहावयास मिळत होता. या गावांप्रमाणेच तालुक्यातील अन्य विविध मराठी भाषिक गावांमधील नागरिकांनी आज आपापले व्यवहार बंद ठेवण्याद्वारे बेळगाव बंदला 100 टक्के प्रतिसाद दिला. पिरनवाडी गावातील मराठी भाषिकांनी तर जाहीरपणे वार्ता फलकावर मजकूर लिहून बेळगाव बंदला संपूर्ण पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या बेळगाव बंदच्या हाकेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी संवेदनशील भागांसह प्रमुख चौकांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.