बेळगाव शहरातील नेहरूनगर येथील पौर कार्मिक वसाहत (पी. के. कॉटर्स) बांधकाम आणि किल्ला तलाव सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ आज बुधवारी राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री बैरती बसवराज यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह अन्य गणमान्य यांच्या उपस्थित उपरोक्त समारंभ झाला. यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी नेहरूनगर येथील पी. के. कॉटर्स उभारणीसा 12 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे किल्ला तलावाचेही आणखी सौंदर्यीकरण केले जाणार असून त्यासाठी 5.5 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या दोन्ही विकासकामांचा राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री बैरती बसवराज यांच्या हस्ते भूमिपूजनाने आज शुभारंभ करण्यात आला. एकंदर काल मंगळवारी शहरातील महापालिकेची नूतन इमारत, अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि रेल्वे स्थानकासमोरील हायटेक बसस्थानक यांचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आज नेहरूनगर येथील पी. के. कॉटर्स आणि किल्ला तलाव सुशोभीकरण कामाला चालना देण्यात आली आहे. ही दोन्ही विकास कामे येत्या 6 महिन्यात पूर्ण केली जाणार असून नागरिकांनी त्यांचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.
यापूर्वी तत्कालीन आमदार रमेश कुडची आणि फिरोज सेठ यांच्यासह जिल्हाधिकारी अतुलकुमार तिवारी यांच्या प्रयत्नातून बेळगाव शहराचे सौंदर्य वाढवणार्या किल्ला तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते.
आता कुडची आणि सेठ या माजी आमदारांचा वसा आमदार ॲड. अनिल बेनके यांनी पुढे सुरू ठेवला आहे. आमदार ॲड. बेनके याच्या पुढाकारामुळे आता किल्ला तलावाच्या ठिकाणी विविध विकास कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे तलावाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.