धर्मांतर विरोधी कायदा लागू झाल्यास ख्रिश्चन समुदायावरील हल्ल्यांमध्ये वाढ होईल. तेंव्हा कर्नाटकात निष्कारण धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणला जाऊ नये, अशी मागणी भारतीय कुस्ती महासंघातर्फे करण्यात आली आहे.
उपरोक्त मागणीचे निवेदन भारतीय ख्रिस्ती वक्कूट अर्थात महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रशांथ जथन्ना, बेळगाव धर्मप्रांताचे बिशप रेव्ह. फर्नांडिस व रेव्ह. नंदकुमार यांच्या स्वाक्षरीने आज राज्याचे कायदामंत्री मधुस्वामी यांना सादर करण्यात आले. धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यामागे भाजपचा राजकीय स्वार्थ आहे. हा कायदा लागू झाल्यास ख्रिश्चन समुदायावरील हल्ल्यांमध्ये वाढ होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ख्रिस्ती समाजाला लक्ष्य करून हा कायदा अंमलात आणण्यात येत आहे. ख्रिश्चन समुदाय सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात चांगले काम करत आहे. आमचा समाज धर्मांतराची सक्ती कधीच करत नाही, जर तसे आढळल्यास जरूर कारवाई करावी. धर्मांतर विरोधी कायदामुळे हल्ल्यांमध्ये वाढ होऊन ख्रिश्चन समाजाचे अस्तित्व धोक्यात येणार असल्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, धर्मांतर विरोधी विधेयक बेळगावच्या अधिवेशनामध्ये मंजूर केले जाऊ नये, यासाठी भारतीय ख्रिस्ती महासंघातर्फे सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले आहे. त्यामध्ये बिशप डेरेक फर्नांडिस यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी आणि ख्रिश्चन बांधव बहुसंख्येने सहभागी झाले आहेत.