सध्या तरुणींकडून प्रेम प्रकरणासह अन्य कारणास्तव घर सोडून पळून जाण्याचे प्रकार वाढले असून गेल्या महिन्याभरात शहर परिसरातून 5 युवती घरातून बेपत्ता झाल्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
तरुणी घरातून पळून जाण्यात प्रकरणी पोलिसात केवळ मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली जात आहे. कांही दिवसानंतर पालकांना आपल्या मुलीने विवाह केल्याचे समजत आहे. गेल्या कांही वर्षांपासून प्रेमप्रकरणातून अनेक तरुण-तरुणी घर सोडून पळून गेल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.
संबंधितांच्या लग्नाला कुटुंबीय आणि विरोध केल्यास प्रेमीयुगुलांकडून अशा प्रकारचे पाऊल उचलण्यात येत असून ही चिंतेची बाब बनली आहे. घर सोडून गेल्यानंतर बहुतांश जण उपनोंदणी कार्यालयात लग्न करतात आणि कांही दिवसानंतर ही जोडपी पुन्हा घरी परतत आहेत. मात्र मुलगा किंवा मुलगी पळून गेल्याचे कळले तर समाजात बदनामीच्या भीतीने बहुतांश पालक बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यास पुढे येत नाहीत. कांही पालक मुलगी बेपत्ता होण्याचे मूळ कारण न सांगता वेगळेच कारण देऊन पोलिसात फिर्याद दाखल करतात. त्यामुळे अशा प्रकरणांचा तपास करणे पोलिसांनाही कठीण जात आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील बेळगाव ग्रामीण, मारीहाळ आणि उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतून ऑक्टोबरमध्ये चार तर ऑगस्टमध्ये एक अशा एकूण पाच युवती बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. बेपत्ता झालेल्या बहुतेक युवती घरी कोणालाही न सांगता उपनोंदणी कार्यालयात कायदेशीर लग्न करून घेत असल्याचे समोर आले आहे.
उभयतांचे फोटो व त्यांच्या बद्दलची माहिती उपनोंदणी कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावली जाते. त्यामुळे दोघांच्या लग्नाबद्दल कोणाला आक्षेप असल्यास त्यांनी महिनाभरात तक्रार नोंदविणे गरजेचे असते. त्यामुळे मुलगी बेपत्ता झालेल्या पालकांनी याबाबत जागरूक राहण्याची गरज व्यक्त होत आहे.