गेल्या चार वर्षातील सातत्यपूर्ण अत्युत्तम कामगिरीबद्दल हालगा, बेळगाव येथील नामवंत होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिला भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट ॲथलीटसाठी असणारा ‘संस्थात्मक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
गेली चार वर्षे क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी बजावणारे साईचे क्रीडापटू आणि प्रशिक्षक अशा संपूर्ण देशातील निवडक 11 जणांचा भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे आज बुधवारी प्रशस्तीपत्रासह रोख रकमेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सत्कारमूर्तींमध्ये बसवान गल्ली, हालगा (ता. जि. बेळगाव) येथील होतकरू युवा महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिचाही समावेश होता. जवाहरलाल नेहरु स्टेडियम नवी दिल्ली येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात अक्षता कामती हिला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उत्कृष्ट ॲथलीटसाठी असणारा ‘संस्थात्मक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
अक्षता कामती ही गेल्या 2017 सालापासून राष्ट्रीयस्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी नोंदवत आहे. तिने प्रामुख्याने गेल्या चार वर्षात महिलांच्या कनिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 3 सुवर्णपदके, खेलो इंडियामध्ये 2 सुवर्णपदके आणि महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक हस्तगत केले आहे.
याखेरीज अन्य स्पर्धांमध्ये देखील भरीव कामगिरी नोंदविली आहे. अक्षता ही सध्या 81 किलो वजनी गटात खेळत असून वेटलिफ्टिंगच्या ‘स्नॅच अँड क्लीन जर्क’ या प्रकारात तिचा हातखंडा आहे.
तिचे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हालगा येथील शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले असून हरियाणा येथे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ती पंजाब येथील लव्हली युनिव्हर्सिटीमध्ये बीएचा अभ्यासक्रम शिकत आहे. उपरोक्त यशाबद्दल अक्षता कामती हिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.