बेळगाव व परिसरातील गावांच्या सुनियोजित विकासाच्या उद्देशाने कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी बेळगाव तालुक्यातील 28 गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
बुडा कार्यक्षेत्रात यापूर्वी तालुक्यातील 27 गावांचा समावेश करण्याचा निर्णय झाला होता. त्यात बेळगाव तालुक्यातील गोजगा गावाचाही समावेश करण्याचा निर्णय गेल्या 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या बुडाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार 28 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीनंतर संबंधित गांवे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्यामुळे ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गदा येणार नसल्याचे बुडा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव व परिसरातील गावांच्या सुनियोजित विकासाच्या उद्देशाने कार्यक्षेत्र वाढविण्याचे बुडाचे म्हणणे आहे. गतवर्षी 4 जुलैला बुडा बैठकीत तालुक्यातील 27 गावांचा समावेश बुडा कार्यक्षेत्रात करण्याचा निर्णय झाला. आता जिल्हा पंचायतीच्या शिफारसीनुसार त्यामध्ये गोजगा गावाचाही समावेश करण्यात आला आहे. शहराच्या 15 ते 20 कि. मी. परिघातील सर्व गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचे ठरले होते.
त्यानुसार बुडाने 27 गावांच्या समावेशाचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात मण्णूर व आंबेवाडीचा समावेश होता. आता गोजगासह 28 गावांचा समावेश झाल्यास 55 गावांवर बुडा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी बेकायदा लेआउट, लँड युज बदल करता येणार नाहीत.
बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या गावांमध्ये निलजी, मुतगा, सांबरा, शिंदोळी, बसरीकट्टी, बाळेकुंद्री बीके, बाळेकुंद्री केएच, होनिहाळ, माविनकट्टी, मास्तमर्डी, धामणे, येळळूर, हट्टी, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, मण्णूर, सुळगा, आंबेवाडी, गोजगा, कल्लेहोळ, होनगा, कडोली, अलतगा, जाफरवाडी, कलखांब, अष्टे व मुचंडी या गावांचा समावेश असणार आहे.