स्वरमल्हार फाऊंडेशन बेळगाव तर्फे ऐश्वर्या यार्दी, धारवाड आणि आकाश पंडित, बेळगाव या उदयोन्मुख युवा कलाकारांच्या गायनाची बैठक नुकतीच संपन्न झाली.
पं कैवल्य कुमार गुरव यांची तालीम घेत असलेल्या ऐश्वर्या ने राग अहिर भैरव मध्ये विलंबित एकतालातील पारंपारिक बंदिश’रसिया म्हारा ‘ आणि त्यानंतर ‘अलबेला सजन आयो रे’ ही त्रितालातील बंदिश पेश केली.
सोहम हर डमरू बाजे- हे नाट्यगीत व तुंगा तीरथी- हे गुरु राघवेंद्र स्वामी स्तुतीपर कन्नड पद सादर करून आपल्या गायनाचे समापन केले. शिस्तबद्धआणि संथ बीलंपद व दमदार तसेच मुलायम तानबाजी मुळे तिने श्रोत्यांची दाद मिळविली.
त्यानंतर आकाश पंडित यांनी सुरुवातीपासूनच बैठकीचा ताबा घेऊन राग नटभैरव मधील गुंज रही- ही विलंबित एकतालातील बंदिश त्यानंतर अब मोरा पिया- ही त्रितालातील बंदिश सादर केली.
नटभैरव नंतर राग सालगरवराळी रागात झपतालातील ‘गुरु के दरस मै कैसे’ आणि ‘धनधन सुदिन आज’ ही त्रितालातील बंदिश सादर केली.
बैठकीची समाप्ती करताना किरवाणी रागातील ‘कब से खडी व्दार पे जो हमरे नंदलाल’ हा दादरा व ‘अवघे गरजे पंढरपुर ‘हा अभंग सादर केला.
बालवयापासूनच मंचीय अनुभव मिळालेल्या आकाशला विविध करण्याची तालीम मिळाली आणि त्याचा सुंदर मिलाफ त्याने आपल्या गायनामध्ये दाखवून दिला. आलाप, बोलआलाप लयकारी युक्त ताना,स्वच्छ निकोप आवाज आणि एखाद्या कसलेल्या कलाकाराला साजेसा मैफलीचा अनुभव उपस्थित श्रोत्यांना आनंद देऊन गेला.
सारंग कुलकर्णी आणि अंगद देसाई यांच्या उत्कृष्ट संवादिनी आणि तबला संगत यामुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.पावनी ऐरसंग आणि राज बिचू यांनी तानपुरा साथ दिली.
एकूणच दोन्ही कलाकारांनी आपल्या उत्तम कलाकारी ने बहुसंख्येने उपस्थित श्रोत्यांची वाहवा मिळविली. आणि शास्त्रीय संगीता तील युवा पिढीकडून असलेल्या आशा पल्लवित केल्या.
सुरुवातीला श्री जगन्नाथ धर्माधिकारी आणि श्रीमती रोहिणी गणपुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
सुप्रसिद्ध अभिनेते श्री प्रसाद पंडित आणि रोहिणी गणपुले यांनी कलाकारांना पुष्प देऊन शुभाशीर्वाद दिले.
रोहिणी कुलकर्णी यांनी कलाकारांचा परिचय व आभार मानले.